एकही रेल्वे प्रवासी नाही बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:47+5:302020-12-04T04:30:47+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर मागील आठ दिवसांत आलेल्या सुमारे १३ हजार ५०० प्रवाशांचे स्क्रिनींग करण्यात ...

एकही रेल्वे प्रवासी नाही बाधित
लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर मागील आठ दिवसांत आलेल्या सुमारे १३ हजार ५०० प्रवाशांचे स्क्रिनींग करण्यात आले. त्यापैकी केवळ १० प्रवाशांमध्ये लक्षणे आढळून आल्याने अँटीजेन चाचणी घेण्यात आली. एकीकडे विमानतळावर पाचशे प्रवाशांमध्येच २१ जण बाधित आढळून आलेले असताना रेल्वे प्रवाशांमध्ये अद्याप एकही प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले नाही.
रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे ७ ते ९ रेल्वेगाड्या वेगवेगळ्या वेळांमध्ये येत आहेत. त्यानुसार तंत्रज्ञांची नेमणुक करण्यात आली आहे. प्रामुख्याने गोवा व दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तसेच गुजरात व राजस्थान या राज्यांतून काही प्रमाणात प्रवासी येत आहेत. या राज्यांतून आलेल्या प्रवाशांचे स्क्रिनींग केले जात असून लक्षणे आढळून आलेल्यांची अँटीजेन चाचणी केली जात आहे. दि. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सुमारे १३ हजार ५०० प्रवाशांचे स्क्रिनींग करण्यात आले असून त्यामध्ये १० जणांमध्ये लक्षणे आढळली. त्यांची अँटीजेन चाचणी केल्यानंतर ते निगेटिव्ह आले. काही प्रवाशांकडे चाचणी अहवाल असतात, असे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आंधळे यांनी सांगितले.
----------
चार राज्यांतून येणाºया गाड्यांमधील सर्व प्रवाशांचे स्क्रिनींग केले जात आहे. तापमान १००.४ फॅरनहाइट किंवा सर्दी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास अँटीजेन चाचणी केली जात आहे. प्रवाशांमध्ये जनजागृती झाल्याचे दिसत असल्याने ते पुरेशी काळजी घेत आहेत. त्यामुळेच अत्यल्प प्रवाशांमध्ये लक्षणे असल्याचे दिसत आहे.
- विवेकानंद जाधव, सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, पुणे महापालिका
------------
रेल्वे स्थानकातील स्थिती
पुणे रेल्वे स्टेशन -
एकुण प्रवाशांची तपासणी - सुमारे १३ हजार ५००
रॅपिड अँटीजेन टेस्ट - १०
बाधित - ००
-------------------