मंडे ठरला ‘नो मनी डे’
By Admin | Updated: November 15, 2016 03:57 IST2016-11-15T03:57:53+5:302016-11-15T03:57:53+5:30
देशभरात सोमवारी (दि. १४) ‘चिल्ड्रेन्स डे’, अर्थात ‘बाल दिन’ साजरा केला जात असताना शहरात मात्र बहुतांश बँकांनी एटीएम बंद ठेवून ‘

मंडे ठरला ‘नो मनी डे’
पुणे : देशभरात सोमवारी (दि. १४) ‘चिल्ड्रेन्स डे’, अर्थात ‘बाल दिन’ साजरा केला जात असताना शहरात मात्र बहुतांश बँकांनी एटीएम बंद ठेवून ‘नो मनी डे’ साजरा केला. त्यामुळे नव्या चलनी नोटा मिळविण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल झाले. परिणामी, तुरळक ठिकाणी सुरू असलेल्या एटीएम केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत होती.
गेल्या बुधवारपासून (दि. ९) एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यानंतर शनिवारी व रविवारी सर्वच बँकांनी आपल्या शाखा सुरू ठेवून जुन्या नोटा बदलून दिल्या. टपाल कार्यालयातूनदेखील नोटा बदलून देण्याची अथवा खात्यात पैसे भरण्याची मुभा होती. यादरम्यान अनेक बँकांची एटीएमदेखील सुरू होती.
काही ठिकाणी पैसे लवकर संपल्याच्या अथवा एटीएम केंद्रच बंद असल्याच्या घटना समोर आल्या. तर, काही ठिकाणी नवीन दोन हजारांची नोट तांत्रिक अडचणींमुळे यंत्राबेहर येत नव्हती. अशा गैरसोयींचा सामना नागरिकांना करावा लागला. यादरम्यान, अनेक ठिकाणची एटीएम केंद्र सुरू असल्याने नागरिकांना पैसे काढता आले. त्यामुळे रविवारी रात्री साडेअकरा-बारापर्यंतदेखील काही एटीएम केंद्रांवर गर्दी दिसत होती.
मात्र, सोमवारी (दि. १४) गुरू नानक जयंतीनिमित्त बँकांना सुटी असल्याने शहरातील सर्वच बँका बंद होत्या. त्यामुळे साहजिकच एटीएम केंद्रांकडे नागरिकांची पावले वळाली.
शहरातील बहुतांश बँकांची एटीएम केंद्रांची शटर बंद होती. तर, काही एटीएम केंद्रांबाहेर एटीएम बंद असल्याचा अथवा पैसे नसल्याचा फलक लावण्यात आला होता. शहरातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच एटीएम सुरू होती. तेथे पैसे काढण्यास गर्दी नागरिकांची उसळली होती. (प्रतिनिधी)