महापालिकेला भुरट्या चोऱ्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 04:08 IST2016-01-12T04:08:05+5:302016-01-12T04:08:05+5:30

एकीकडे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव तसेच शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामांच्या साहित्यांची राजरोस चोरी, तसेच पालिकेच्या विविध विभागांमधील

NMC receives eavesdropping of thieves | महापालिकेला भुरट्या चोऱ्यांचे ग्रहण

महापालिकेला भुरट्या चोऱ्यांचे ग्रहण

पुणे : एकीकडे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव तसेच शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामांच्या साहित्यांची राजरोस चोरी, तसेच पालिकेच्या विविध विभागांमधील साहित्यांच्या चोरीचे ग्रहण गेल्या काही वर्षांत महापालिकेला लागले आहे. विशेष म्हणजे, दर वर्षी गटाराच्या झाकणांपासून पुलाच्या सुशोभीकरणासाठी लावलेली रेलिंग आणि चक्क बसथांबेही चोरी होत असताना, या प्रकाराची दखल घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे ना कोणता विभाग आहे, ना चोरी झालेले साहित्य काय होते, याची दखल घेणारी यंत्रणा; त्यामुळे एकीकडे नागरिक कर भरतात, तर दुसरीकडे हा जमा झालेला कर सुशोभीकरणाच्या नावाखाली खर्च केला जातो व तिसरीकडे या मालमत्तेवर भुरटे चोर हात साफ करतात. याला महापालिका प्रशासन कधी आळा घालणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडून शहरात दर वर्षी नवीन विकासकामे तसेच देखभाल-दुरुस्तीची जवळपास हजार कोटींची कामे केली जातात. मात्र, ही कामे एकदा केल्यानंतर त्याचे पुढे काय झाले? करण्यात आलेले काम व्यवस्थित आहे का? त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची काय स्थिती आहे? याची कोणतीही पाहणी करणारी यंत्रणा महापालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे एकाच कामावर वारंवार खर्च करण्याचे प्रकार महापालिकेला नवीन नाहीत. मात्र, पालिकेकडून शुभोभीकरण करण्यात आलेल्या तसेच देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली शहरात बदलण्यात आलेल्या साहित्यांच्या चोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेष म्हणजे, हे प्रकार डोळ्यासमोर असतानाही प्रशासनाकडून त्याकडे साधे ढुंकून पाहण्याची तसदीही घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही बाब लोकमतकडून शहरात करण्यात आलेल्या काही प्रातिनिधिक कामांच्या पाहणीत दिसून आली आहे.

शिवाजी पूल (महापालिका भवनासमोर)
शहरातील ब्रिटिशकालीन पूल असलेला पालिका भवनाच्या परिसरातील शिवाजी पूल हा गेल्या काही वर्षांत भुरट्या चोरांसाठी कुरणच बनले आहे. ऐतिहासिक पूल असल्याने महापालिकेकडून दर वर्षी या पुलावरील पदपथावर तत्कालीन स्वरूपाचे लोखंडी रेलिंग बसविण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत तीन वेळा या ठिकाणी वेगवेगळी रेलिंग बसविण्यात आली आहेत. मात्र, प्रत्येक वेळी भुरट्या चोरांकडून त्यावर हात साफ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी लावण्यात आलेले पथदिव्यांचे खांबही आधी धक्के मारून खाली पाडले जातात. त्यानंतर ते रात्रीच्या अंधारात पसार केले जातात.

तीन लाखांच्या बसथांब्यांचे उरले
सांगाडे (सिंहगड रस्ता)
शहरात महापालिकेकडून तसेच पीएमपीकडून लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव तब्बल तीन लाख रुपयांचा एक असे स्टेनलेस स्टीलचे बसथांबे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यावरही चोरट्यांनी हात साफ केला आहे. एवढेच काय, तर बीआरटी मार्गावर उभारलेले बसथांब्यांच्या खुर्च्या तसेच पत्रेही पळविण्यात आले आहेत. या बसथांब्यांच्या मागील बाजूला असलेले अ‍ॅल्युमियम शीट तसेच पुढील रेलिंगला असलेली स्टीलची जाळी चोरट्यांनी गायब केलेली आहे.

यशवंतराव चव्हाण भुयारी मार्ग (संचेती हॉस्पिटलसमोर)
संचेती रुग्णालय परिसरात होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून येथे भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गात प्रशासनाकडून सुभोभीकरणासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या टाइल लावण्यात आल्या आहेत. अतिशय महागड्या असलेल्या या टाइल स्क्रू आणि लोखंडी पट्ट्याच्या साह्याने बसविण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात या टाइल एक-एक करून चोरीला जात आहेत. सुरुवातीला या टाइलचे स्क्रू ढिले केले जातात. त्यानंतर ते सतत ओढले जातात. त्यानंतर त्या ढिल्ल्या पडताच रात्रीच्या अंधारात काढून घेऊन चोरटे पसार होत असल्याचे या ठिकाणी दिसून येते.


या विभागांना
चोऱ्यांचे ग्रहण
पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, डे्रणेज विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, हेरीटेज विभाग, पथ विभाग, वाहतूक नियोजन विभाग, अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग, भवन विभाग.

Web Title: NMC receives eavesdropping of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.