हरित सेनेच्या वतीने निर्माल्य संकलन
By Admin | Updated: September 10, 2014 00:16 IST2014-09-10T00:16:26+5:302014-09-10T00:16:26+5:30
प्रतिवर्षाप्रमाणे शाडू मातींच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते

हरित सेनेच्या वतीने निर्माल्य संकलन
दौंड : दौंड येथील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना पथकाकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करण्याबरोबर निर्माल्य संकलन करण्यात आल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य तुकाराम गायकवाड यांनी दिली.
प्रतिवर्षाप्रमाणे शाडू मातींच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रशालेतील बाल मंडळांना भिमथडी शिक्षण संस्थेचे सदस्य विक्रम कटारिया यांच्या हस्ते मोफत वितरीत करण्यात आल्या. या बालगणेश मंडळामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली. जलप्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी यावर्षी गणेशमूर्ती, अनंत चतुर्थी दिवशी शांततेत गुलालाची उधळण न करता प्रशालेत आणून त्यांची विधीवत पूजा करुन प्रशालेतील अॅल्युमिनियमच्या मोठ्या भांड्यात विसर्जित केल्या.
हरित सेनेचे विद्यार्थी प्रवीण बोरकर, आदेश गायकवाड, अभिषेक चौहान, ओंकार ताठे, गौरव हिरणावळे, आशिष व्हंकाडे, प्रथमेश उतरडे, अमेय घोलप, ऋषिकेश पळसे, आदेश मुनोत, कुणाल बागल, अनिरुद्ध लेले, अवधूत वाळके, धनंजय वाडेकर आदींनी नदीवरील निर्माल्य संकलन केले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेतील प्रथम तीन बालगणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे स्व. कि. गु. कटारिया यांचे स्मरणार्थ पर्यावरणपूरक गणेश मंडळ पुरस्कार देण्यात येणार असल्याची हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली. या उपक्रमांचे हे सलग सातवे वर्ष आहे.
(वार्ताहर)