सराईत चोरट्याकडून नऊ दुचाकी वाहने जप्त
By Admin | Updated: January 25, 2017 02:13 IST2017-01-25T02:13:17+5:302017-01-25T02:13:17+5:30
मौजमजा करण्यासाठी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली असून

सराईत चोरट्याकडून नऊ दुचाकी वाहने जप्त
पुणे : मौजमजा करण्यासाठी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून पावणेतीन लाख रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
प्रवीण ऊर्फ प्रशांत दिलीप जाधव (वय २१, रा. इनामके मळा, लोहियानगर) असे त्याचे नाव आहे. जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली की, शहरातील विविध भागात दुचाकी चोरणारा प्रवीण जाधव हा शुक्रवार पेठेतील स्वामी गगनगिरी नवरात्र मंदिर परिसरात येणार आहे.
त्यानुसार खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दुचाकीवरून आलेल्या जाधवला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने सारसबाग येथील सणस ग्राऊंड परिसरातून दुचाकी चोरल्याचे समोर आले.
खडक पोलिसांनी त्याला अटक करून पुढे केलेल्या चौकशीत त्याने एकूण ९ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. जाधव याच्याविरुद्ध अलंकार, स्वारगेट, खडक, सिंहगड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, सहायक निरीक्षक व्ही. डी. केसकर, तपास पथकाचे उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी संतोष मते, बशीर शेख, बापू शिंदे, राकेश क्षीरसागर, रवी लोखंडे, संदीप कांबळे यांच्या पथकाने केली.
(प्रतिनिधी)