यशस्वी व्यक्तींना ‘निंबोडी गुणगौरव पुरस्कार २०१७’
By Admin | Updated: May 10, 2017 03:43 IST2017-05-10T03:43:11+5:302017-05-10T03:43:11+5:30
इंदापूर आणि बारामती तालुक्यांच्या सीमेवरील निंबोडी हे गाव. कायम अवर्षणग्रस्त ही या गावाची ओळख आहे. राज्यात इतरत्र

यशस्वी व्यक्तींना ‘निंबोडी गुणगौरव पुरस्कार २०१७’
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : इंदापूर आणि बारामती तालुक्यांच्या सीमेवरील निंबोडी हे गाव. कायम अवर्षणग्रस्त ही या गावाची ओळख आहे. राज्यात इतरत्र शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असताना या गावातील शेतकऱ्यांनी दिलेला संदेश जीवन बदलविणारा ठरला आहे. शेतकरीबहुल गावातील लोकांनी शिक्षण व इतर संलग्न व्यवसायांत उल्लेखनीय यश मिळविले आहे. गावाचे नाव मोठे करणाऱ्या यशस्वी व्यक्तींचा ‘निंबोडी गुणगौरव पुरस्कार २०१७’ देऊन कौतुक करण्यात आले. गावकऱ्यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला, हे विशेष.
निंबोडी गावात पर्जन्यमानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अवर्षणग्रस्त गाव ही ओळख जणू कायमचीच आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतदेखील वेगळी वाट निवडून या गावातील अनेकांनी मोठे यश मिळविले. त्यातून गावाचे नाव मोठे केले. त्यांची उत्कृष्ट कामगिरी ही
इतर भागातील लोकांना प्रेरणादायी ठरावी, यासाठी गावकऱ्यांनी
‘फिल्म अॅवॉर्ड्स’च्या धर्तीवर
गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्ये शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा, वैद्यकीय, कृषी, अध्यापन सेवा, प्रशासकीय सेवा, व्यक्तिमत्त्व, समाजसेवा, संप्रदाय आदी क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
शिक्षण : हर्षद घमरे, पूजा खाडे, प्रशासकीय सेवा : डॉ. सागर डोईफोडे, आयएएस, क्रीडा : हनुमंत घोळवे, उद्योग : पंडित घोळवे, कृषी : अशोक बोबडे, अध्यापन सेवा : डॉ. सोपान घोळवे, एम फिल. पीएच.डी., व्यक्तिमत्त्व : भारत वणवे, विज्ञान अधिकारी टाटा कॅन्सर हॉस्पिटल, समाजसेवा : भास्कर घोळवे, संप्रदाय : धर्मराज भोईटे, जीवन गौरव पुरस्कार : डॉ. मुरलीधर घोळवे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
फिल्म अॅवॉर्ड्सच्या धर्तीवर ग्रामीण भागातील संगीत व लाईव्ह स्क्रीनसह चाललेला पहिलाच कार्यक्रम परिसरात पार पडला. त्याची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली. येथील डॉ. महेश घोळवे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी विराज घोळवे, सरपंच प्रवीण घोळवे व यात्रा कमिटीने सहकार्य केले.