रात्र निवारा गैरसोयींचे आगार
By Admin | Updated: September 15, 2015 04:28 IST2015-09-15T04:28:31+5:302015-09-15T04:28:31+5:30
मंडईजवळील व्यंकटेश मार्केटच्या तळमजल्यावरील प्रशस्त आवारात महापालिका प्रशासनाने बेघरासांठी तात्पुरता निवारा म्हणून ‘रात्र निवारा’ केंद्राची सोय केली आहे.

रात्र निवारा गैरसोयींचे आगार
- सचिन देव, पिंपरी
मंडईजवळील व्यंकटेश मार्केटच्या तळमजल्यावरील प्रशस्त आवारात महापालिका प्रशासनाने बेघरासांठी तात्पुरता निवारा म्हणून ‘रात्र निवारा’ केंद्राची सोय केली आहे. या ठिकाणी फक्त रात्री झोपण्यासाठी कुठलेही शुल्क न आकारता प्रवेश दिला जातो. आलेल्या व्यक्तीला सर्व प्राथमिक सुविधा उत्तम प्रकारे मिळणार असल्याच्या सूचनाफलकही प्रशासनाने निवारा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे. मात्र, सुविधा फक्त कागदावरच असून, प्रत्यक्षात या केंद्रात प्रचंड गैरसोय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन म्हणून महापालिकेने रात्र निवारा केंद्र सुरू केले आहे. सुमारे ५० ते ६० व्यक्तींची राहण्याची सोय होईल, अशी जागा उपलब्ध करून दिली आहे.
रात्र निवारा केंद्रात जाण्यासाठी दोन प्रवेशद्वारे असून, त्यापैकी एक प्रवेशद्वार बंदच ठेवलेले दिसून आले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला होता, तर आजूबाजूलाही दुर्गंधी पसरली आहे. येथील दैनंदिन साफसफाईसाठी महिन्यातून सफाई कर्मचारी कधी तरी येत असल्यामुळे हा कचरा साचला आहे. तसेच, पावसाचे पाणी त्यावर पडून त्या ठिकाणी अधिकच दुर्गंधी पसरली आहे.
रात्र निवारा केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे तेथे निवाऱ्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला पिण्याचे पाणी मिळत नाही. विकतचे पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्यासह विविध गैरसोयींशी सामना करावा लागत आहे. पिण्यासाठी आणि अंघोळीसाठीही पाणी नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणाहून नळाचे पाणी आणावे लागते. गरम पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे भाग पडते.
निवाऱ्याची सोय नाही
रात्रीच्या निवाऱ्यासाठी आलेल्यांना रात्रीच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यावरील गाद्या, उशा फाटलेल्या व मळकट झाल्या आहेत. बेडशीट व चादरही नियमितपणे धुतल्या जात नाहीत.
विद्युत दिवे गायब
रात्र निवारा केंद्रातील एकाही खोलीमध्ये छतावरील पंखे दिसून आले नाहीत. एखादा विद्युत दिवाही लावलेला दिसून आला नाही. तसेच, शौचालयांमध्येही दिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी गैरसोय होते.
निवाऱ्यात खेळला जातो जुगार
निवारा केंद्रातील एका खोलीमधील कचराकुंडीत जुगार खेळण्याचे पत्त्यांचे कॅट आढळून आले. यावरून तेथे दिवसा किंवा रात्री पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले.
प्रथमोपचार पेटीची सुविधा तर दूरच...
निवाऱ्यासाठी आलेल्या एखाद्या व्यक्तीला दुखापत, इजा झाल्यास प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे, असे तेथील सूचनाफलकावर लिहिले आहे. प्रत्यक्षात मात्र प्रथमोपचार पेटी कोठेच दिसून आली नाही.
गळके छत, डासांचा उपद्रव
केंद्रातील एका खोलीत छताच्या गळतीची समस्या आहे. त्या ठिकाणी रात्री झोपणाऱ्यांची पंचाईत होते. खोलीत कायम ओल असते. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे गळती होऊन त्या पाण्याची डबकी साचल्याचे अद्यापही तेथे दिसून येते. भिंतीही ओल्या होऊन डागाळलेल्या आहेत. एकंदरीत पाहता विविध समस्यांनी रात्र निवारा केंद्रात कळस गाठलेला आढळून आला.