पुढचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्यवृद्धी वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:51+5:302021-09-19T04:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्वारी, बाजरी या धान्यांबरोबरच नाचणी, वरई अशा पारंपरिक भारतीय पौष्टिक शेतमालाला उठाव मिळावा, यासाठी ...

पुढचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्यवृद्धी वर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्वारी, बाजरी या धान्यांबरोबरच नाचणी, वरई अशा पारंपरिक भारतीय पौष्टिक शेतमालाला उठाव मिळावा, यासाठी येते वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक धान्यवृद्धी वर्षे म्हणून साजरे करायला आंतरराष्ट्रीय फूड ऑर्गनायझेशनने मान्यता दिली आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी केंद्रीय कृषी खाते प्रयत्न करत आहे.
त्यासाठी हैदराबाद इथे दोन दिवसीय देशस्तरीय पौष्टिक धान्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील वरिष्ठ कृषी अधिकारी या परिषदेला उपस्थित राहिले असून, रविवारी व सोमवारी त्यामध्ये नियोजनावर चर्चा होणार आहे.
कृषी विभागाने ही माहिती दिली. गहू व अन्य धान्यांच्या तुलनेत भारतातील अनेक पारंपरिक पौष्टीक तृणधान्ये मागे पडली आहेत. इतर धान्याच्या तुलनेत यामधील प्रथिनं तसेच अन्य पोषक घटकांचे प्रमाण कितीतरी जास्त आहेत. ते जगासमोर यावे यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय फूड ऑर्गनायझेशनला या धान्यांसाठी विशेष वर्षे साजरे करण्याची सूचना केली होती.
त्याला ऑर्गनायझेशनने मान्यता दिली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम, या तृणधान्याची विशेष लागवड, त्याचे विविध प्रकार, त्याचे शास्त्रीय विश्लेषण, प्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर हैदराबादला केंद्रीय कृषी विभागाने ही विशेष परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती मिळाली.