वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनावे
By Admin | Updated: January 9, 2015 01:04 IST2015-01-09T01:04:16+5:302015-01-09T01:04:16+5:30
वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनून समाजाला त्याचा खरा चेहरा दाखविण्याचे काम केले पाहिजे. समाजाची शाश्वत मूल्ये काय आहेत तीही समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे,
वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनावे
पुणे : वृत्तपत्रांनी समाजाचा आरसा बनून समाजाला त्याचा खरा चेहरा दाखविण्याचे काम केले पाहिजे. समाजाची शाश्वत मूल्ये काय आहेत तीही समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस सुमित भावे व्यासपीठावर होते.
फडणवीस म्हणाले , ‘‘लोकशाही अधिक प्रगल्भ व्हावी यासाठी कायदेमंडळ, न्यायमंडळ, प्रशासकीय व्यवस्था आणि पत्रकारिता या चारही स्तंभाना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांमध्ये पत्रकारांना पूर्ण सहकार्य राज्य शासन देईल. पत्रकारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. कारण निर्भय अशा प्रकारच्या कामाची त्यांच्याकडून अपेक्षा असते.’’
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सोशल मीडिया हे अतिशय महत्त्वाचे साधन असून, त्याची काही मूल्ये तयार झाली पाहिजेत. मीडियाच्या दुरुपयोगातून आपले जी सामाजिक घडण आहे, त्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्याच्यावर आघात होत आहेत.’’
बापट म्हणाले, ‘‘ स्पर्धेच्या युगात बातमीचे स्वरूप समाजाला न्याय देणारे असावे. पत्रकारांविषयी आदरयुक्त भीती समाजात असणे ही कायद्यापेक्षा मोठी गोष्ट आहे.’’