पुणे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पती व सासूवर गुन्हा दाखल केला आहे.
सुशांत वाघमारे आणि प्रमिला वाघमारे (रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माधुरी सुशांत वाघमारे (वय २३, रा. मुजांबा वस्ती, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी माधुरीचे वडील आनंदा लक्ष्मण कांबळे (वय ४७, रा. निवृत्ती हाईट, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० एप्रिल ते २ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी माधुरी हिचा सुशांत याच्याबरोबर १० एप्रिल रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर सुशांत हा वारंवार दारू पिऊन येऊन तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. सासूने घरातील स्वयंपाक येत नाही, वारंवार माहेरी जायचे नाही, असे म्हणून तिचा मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून माधुरी हिने २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करीत आहेत.