खेड : वाकी बुद्रुक ( ता. खेड ) येथील संतोषनगर परिसरात निर्जनस्थळी रस्त्यावर टॉवेलमध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवलेले मृत अवस्थेतील नवजात अर्भक आढळून आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याची शक्यता पोलिसांतर्फे वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोषनगरचे पोलीस पाटील अजित मच्छिंद्र कड ( वय - ३५ वर्षे, रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाकी बुद्रुक ( ता. खेड ) गावाच्या हद्दीतील संतोषनगर येथे संदीप नामदेव कड यांच्या मालकीच्या गट नं. ३४ येथे हे अर्भक आढळून आले होते. कोणीतरी अज्ञात महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले.त्यामुळे संबंधित अर्भक मयत झाले आहे. या धक्कादायक घटनेने पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी, अरुण लांडे, मुश्ताक शेख व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
खेडमध्ये रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:29 IST
अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले असल्याची शक्यता आहे.
खेडमध्ये रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक
ठळक मुद्देयाप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल