नवीन मतदारांना मिळणार घरपोच मतदार ओळखपत्र
By Admin | Updated: January 26, 2017 00:03 IST2017-01-26T00:03:23+5:302017-01-26T00:03:23+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष मतदार नावनोंदणी मोहिमेत जिल्ह्यात तब्बल ४ लाख नवीन मतदारांची नावनोंदणी झाली आहे.

नवीन मतदारांना मिळणार घरपोच मतदार ओळखपत्र
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष मतदार नावनोंदणी मोहिमेत जिल्ह्यात तब्बल ४ लाख नवीन मतदारांची नावनोंदणी झाली आहे. या सर्व मतदारांना महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान चिठ्ठीचे (व्होटर स्लिप) वाटप करताना मतदार ओळखपत्राचे देखील वाटप करण्यात येणार आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान विशेष मतदार नाव नोंदणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये नव्याने मतदार नाव नोंदणी करणे, पत्ता बदल करणे, नाव स्थलांतर करणे, मयत, दूबार व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी अर्ज स्विकारण्यात आले.
या विशेष मोहिमेमध्ये सर्वांधिक अर्ज नव्याने नाव नोंदणी व पत्ता बदल करण्यासाठीच आले. जिल्हा प्रशासनाने प्रथमच मोठ्या प्रमाणात १८ ते १९ वय असलेल्या नव मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहिम घेऊन १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज भरून घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात तब्बल ४ लाखांपेक्षा अधिक मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली.
या सर्व मतदारांना महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ बुधावर (दि.२५) रोजी राष्ट्रीय मतदार दिना निमित्त काही मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करून करण्यात आले आहे. (वार्ताहर)