पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नव्या जागेला अद्याप परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:11+5:302021-02-05T05:01:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य ...

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नव्या जागेला अद्याप परवानगी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारकडे आलेल्या नव्या जागेच्या प्रस्तावावर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन जागेला मंजुरी मिळाल्याची अफवा लोकांमध्ये पसरली असून, याबाबत पवार यांनी सोमवारी (दि. २५) माहिती दिली.
विमानतळाच्या अगोदरच्या प्रस्तावात असलेली जमीन ही बागायती आणि शेती उपयोगाची असल्याने शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला आहे. यासंदर्भात दिल्लीत झालेल्या बैठकीत मूळ जमीन असलेली गावे वगळून नव्या गावांचा समावेश करण्याचा निर्णय झाला यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी विमानतळाच्या नव्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. विमानतळाच्या जागेवरुन सध्या शेतकऱ्यांकडून आंदोलनाची भूमिका घेतली जात असून राजकीय मुद्दे देखील उपस्थित झाले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री पवार यांना विमानतळाच्या जागेच्या मंजुरी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, की जुन्या जागेला जोडूनच नव्या जागेचा समावेश करण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. कोणतेही विमानतळ होत असताना त्याला आवश्यक त्या मंजुऱ्या लागतात. ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेतले जाते आणि त्यानंतर अंतिम निर्णय होतो असे पवार म्हणाले.
चौकट
खेडच्या प्रस्तावाचे स्वागतच
पुरंदर विमानतळाच्या जागेवरून वाद सुरू आहेत असे असताना खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी पुरंदर विमानतळ पुन्हा खेड तालुक्यात आणावा अशी मागणी केली आहे. याबद्दल अजित पवार म्हणाले की, मोहिते यांच्या मागणीचे स्वागत आहे. विमानतळ कोठेही करायचे झाले तर त्याला पुण्यातील एअरफोर्सच्या विमानतळाची ‘एनओसी’ लागेल. धावपट्ट्या समांतर ठेवण्याबद्दल शास्त्रीय कारणे आहेत. अभ्यास करून हा निर्णय होईल.
---
कोणाची किती मुलं किती लग्न सांगू का मग
राज्याचेसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच सुनावले. कोणाला किती मुलं आणि कोणाचं लग्न झालं होतं सांगू का? अशी विचारणा केली आहे.आता विरोधकांना काय म्हणावं…एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचं आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो असे पवार म्हणाले.
----
मग काय वाजवायचे ते वाजवा
कोथरूड मधील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या. त्याबद्दल पत्रकारांनी अजित पवार यांना छेडले असता पवार म्हणाले, मला काल शिवेंद्रराजे भेटले, आज परिचारक भेटले. हे जरी वेगळया राजकीय पक्षात असले तरी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे'' मेधा कुलकर्णी देखिला भेटल्या विकास कामासंदर्भात सरकार म्हणून हे लोक भेटत असतात. आणि तसंच राजकीय काही असलं तर तुम्हाला ठासून सांगू मग काय जे वाजवायचे ते वाजवा.