राजगुरूनगरसाठी नवीन पाणीयोजना

By Admin | Updated: October 9, 2016 04:15 IST2016-10-09T04:15:16+5:302016-10-09T04:15:16+5:30

शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा २७ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

New plan for Rajgurunagar | राजगुरूनगरसाठी नवीन पाणीयोजना

राजगुरूनगरसाठी नवीन पाणीयोजना

राजगुरुनगर : शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा २७ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. कडूस प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसह शहरातल्या वितरण व्यवस्थेचा त्यात समावेश आहे. चासकमान धरणाचा पाणीसाठा हा उद्भव धरून हा अहवाल बनविण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांनी दिली.
पूर्वीची कडूस प्रादेशिक योजना राजगुरुनगरकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे चासकमान धरणातून पाणी उचलून वेताळे गावाच्या टेकडीवर बसविलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून नैसर्गिक उताराने ३१ गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. पण, वीजबिल भरता न आल्यामुळे आणि अन्य काही कारणांनी ती योजना बंद पडली होती.
आता त्या योजनेच्या राजगुरुनगरपर्यंतच्या जलवाहिन्या दुरुस्ती, आवश्यक तेथे नवीन जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राची आणि अन्य यंत्रणेची दुरुस्ती या कामांचा समावेश या सविस्तर प्रकल्प अहवालात करण्यात आला आहे.
या योजनेचे पाणी गावात वितरित करण्यासाठी ६२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे जाळे गावात टाकण्याची तरतूद अहवालात केली आहे. या जलवाहिन्या उच्च घनतेच्या पॉलिथिनच्या असणार आहेत. त्यांना छिद्र पाडून कोणालाही सहज पाणी घेणे शक्य होणार नाही. फक्त नगर परिषदच यंत्राद्वारे पाणीजोड देऊ शकेल, अशी यात तरतूद आहे. तसेच ३५ लाख लिटर क्षमतेच्या पाच नवीन टाक्या उभारण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)

नागरिकांना
२४ तास पाणी
या योजनेतून नागरिकांना २४ तास पाणी मिळेल, अशा प्रकारे नियोजन केले आहे. दर दिवशी दरडोई १३५ लिटर पाणी वापरात येईल, असे अहवालात गृहीत धरले आहे. वेताळे गावाच्या उंच
टेकडीवरून पाणी येणार असल्याने ते पुरेशा दाबाने ८ मीटर ते २५ मीटर उंचीपर्यंत मिळू शकणार आहे, अशी माहिती हा अहवाल बनविणाऱ्या ग्राफीकॅड सिस्टिम कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजू रत्नपारखी यांनी दिली. पाण्याचा उद्भव चासकमान धरण असल्याने पाण्यात मधल्या गावांचे आणि राजगुरुनगरचे अशुद्ध पाणी मिसळण्याचा प्रश्न राहणार नाही, असे ते म्हणाले.

राजगुरुनगरसाठी नवीन पाणीपुरवठा योजना करण्याबाबत ग्रामपंचायत असल्यापासून वेगवेगळे प्रस्ताव विचाराधीन होते. या ना त्या कारणाने ते प्रस्ताव मागे पडत गेले आणि नवीन पाणीयोजना अद्याप झालेली नाही. अगदी मंत्रालयस्तरावर निर्णय होऊनही पाणीयोजना झालीच नाही. राजगुरुनगरकरांच्या वाट्याला नेहमीच अशुद्ध पाणी आले. यामुळे पिण्याचे पाणी गेले अनेक वर्षे नागरिक विकत घेत आहेत. या वर्षीच्या मध्यावर ८८ लाख रुपये खर्च करून जिल्हा नगरोत्थान योजनेतून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना असून, नवीन पाणीपुरवठा योजना गरजेची आहे. म्हणून नगर परिषदेने हा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केला आहे आणि शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. राज्य नगरोत्थान योजनेतून त्याला मंजुरी मिळावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Web Title: New plan for Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.