गुन्हेगारीतही नवीन चेहरे, कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:14+5:302021-06-21T04:08:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली असून, अनेक नवीन तरुण मुले अशा टोळ्यांमध्ये सहभागी ...

New faces in crime too, Corona raises police headaches | गुन्हेगारीतही नवीन चेहरे, कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी

गुन्हेगारीतही नवीन चेहरे, कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना काळात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली असून, अनेक नवीन तरुण मुले अशा टोळ्यांमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. या गल्लोगल्ली पसरलेल्या नव्या टोळ्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शहर पोलीस दलाने केलेल्या पाहणीत प्रामुख्याने शहराच्या उपनगरांमध्ये अशा टोळ्या नव्याने उदयाला आल्या आहेत. शहरात सध्या २६ नव्या टोळ्या निर्माण झाल्या असून, त्यात ३०० हून अधिक तरुण सहभागी असल्याचे दिसून येत आहे.

या २६ टोळ्यांमध्ये सहभागी होणारे तरुण हे प्रामुख्याने स्थानिक आहेत. परिसरात आपले वर्चस्व निर्माण करण्यावरून त्यांच्यात मारामा-या होत असतात. तसेच आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करणे, दहशत निर्माण करणे, असे गुन्हे ते करत असतात. त्यातील अनेक जण आपण वस्तीमध्ये ‘भाई’ म्हणून ओळखले जावे, यासाठी असे दहशत निर्माण करणारे गुन्हे करतात. जेणेकरून पोलीस आपल्याला अटक करतील. जामिनावर सुटल्यावर वस्तीमध्ये आपले बस्तान बसवितात. लोकांकडून हप्ते वसुली करताना दिसतात. अशा १० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. तसेच वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत अशा टोळ्यातील १०० हून अधिक तरुण तुरुंगात आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे निर्माण होतेय आकर्षण

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. गेले वर्षभर कॉलेज बंद असल्याने असंख्य तरुण काहीही काम नसल्याने कट्ट्यांवर बसून गप्पा मारतात. त्याचवेळी अनेक स्थानिक भाईगिरी करणाऱ्या गुन्हेगारांचा रुबाब, त्यांची दादागिरी, आजूबाजूचे दुकानदार त्यांना देत असलेली इज्जत याचे आकर्षण या तरुणांमध्ये निर्माण होते. त्यातून ते या गुन्हेगारीकडे आकर्षित होतात. त्यांचे फोटो आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून ठेवतात.

पोलिसांकडून समुपदेशन

कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याची मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून जंगी मिरवणूक काढली होती. मारणेची ही रॅली संपूर्ण राज्यात व्हायरल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मारणेबरोबरच संघटित गुन्हेगारी टोळींविरुद्ध मोहीम उघडली. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. या मुलांचे भरोसा सेलमार्फत समुपदेशन करण्यात येत आहे.

गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाया

गजानन मारणे, रवींद्र ब-हाटे, बंदू आंदेकर, नीलेश घायवळ, आकाश कंचिले, जयेश लोखंडे, गणेश पवार, बापू नायर, सूरज ठोंबरे, सूरज दयाळू, राजाभाऊ राठोड अशा वेगवेगळ्या ३३ जुन्या-नव्या टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली. जवळपास ३०० जणांना तडीपार केले. २० जणांना स्थानबद्ध केले आहे.

.....

गुन्ह्यांचा प्रकार मे २०२१ अखेरजून २०२० अखेर

खून ३५ ३६

खुनाचा प्रयत्न १२१ ४४

दरोडा ९ ३

मोबाईल चोरी ४० ११

................................................................

सर्व गुन्हे २९४९ २५९१

.......

आम्ही प्रचलित मोक्का, एमपीडीए कायदे सक्रियपणे राबवित आहोत़ गुन्हेगारांचा बिमोड करण्याबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांबद्दल आकर्षण असलेल्या तरुणांचे समुपदेशन करत आहोत़ गुन्हेगारीला अटकाव करण्याबरोबरच गुन्हेगारांचा बिमोड करणे आणि शहर सुरक्षित ठेवण्याला आमचे प्राधान्य आहे़

- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Web Title: New faces in crime too, Corona raises police headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.