पुणे : निवडून आल्यावर व त्यातही वेगवेगळ्या पक्षांमधले असतील, तर एका प्रभागातील चार नगरसेवकांमध्ये मतभेद होतील, अशी चर्चा सध्या आहे. नंतर काय व्हायचे ते होईल, आता निवडणूक सुरू असताना मात्र चार उमेदवारांच्या पॅनेलचा एकत्रित प्रचार वेळेचे, खर्चाचे व्यवस्थित नियोजन करीत सुरू आहे. एखादी व्यावसायिक कंपनीही लाजेल अशा समित्या, त्यावर विश्वासू कार्यकर्ते, घरातील महिला, युवकांचा विशिष्ट भागात स्वतंत्र प्रचार, अशी रचना करून सुरू असलेल्या या कॉर्पोरेट स्टाइल प्रचाराने मतदारराजाही अवाक झाला आहे. निवडणूक म्हणजे, पैशाचा खेळ असेच चित्र झाले आहे. त्यासाठी चारही उमेदवारांनी ‘तुझे तू माझे मी’ असे न करता कॉन्ट्रिब्युशन करून पैसे जमा केले आहेत. ते कुठे १० लाखांपासून ते ५० लाख रुपयांपर्यंत असे आहेत. जमा झालेल्या या पैशाचा विनियोग करण्यासाठी चारही उमेदवारांच्या निकटच्या नातेवाइकांची एक कमिटी तयार करण्यात आली आहे. एकत्रित खर्च या कमिटीत आधी चर्चा करून, त्यांच्या संमतीनेच होतो. या कमिटीकडून उमेदवारांनी एकत्रित कोणत्या भागात कधी जायचे, कोणाला भेटायचे, याचे नियोजन केले जाते. कुठे धोका होण्याची शक्यता आहे, तिथे प्राधान्याने भेट दिली जाते. त्यात्या भागातील पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आधीच निरोप दिले जातात. औक्षणसारख्या पारंपरिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. सकाळी ८ पासून ते ११ पर्यंत व सायंकाळी ५ पासून ते रात्री ८ पर्यंत अशा फेऱ्या, मधल्या वेळेत महत्त्वाच्या बैठका, काही कार्यकर्त्यांकडे मतदार याद्या तपासण्याचे काम आहे. काहींकडे रिक्षांमधून केल्या जाणाऱ्या प्रचाराची जबाबदारी आहे. संपर्क कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची वास्तपुस्त करण्यासाठी काही जणांना तयार करण्यात आले आहे. वचननामा, वचनपूर्ती, ध्यासपर्व, निर्धारनामा अशा विविध नावांचे हे अहवाल रंगीत छायाचित्रे, आकर्षक मजकूर, कामांची माहिती यांनी सजवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)संपर्क कार्यालयेही सजलीयावेळचे प्रभाग बरेच मोठे आहेत. त्यात विविध भागांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांना एकापेक्षा जास्त संपर्क कार्यालये सुरू करावी लागली आहेत. या कार्यालयांमध्ये दिवसभरात एकदा तरी भेट देऊन कार्यकर्त्यांशी उमेदवार चर्चा करताना दिसतात. नागरिक आले तर त्यांची भेट घेऊन त्यांना आवाहन केले जाते. संपर्क कार्यालयेही फ्लेक्स, त्यावर उमेदवारांची विशिष्ट पोज मधील छायाचित्र यांनी सजविण्यात आली आहेत. आचारसंहितेचे पालन होते आहे किंवा नाही हे पाहण्यासाठीही स्वतंत्र कार्यकर्ते तयार करण्यात आले आहेत. सर्व खर्च, मर्यादेत, रोजच्यारोज निवडणूक शाखेकडे वेळेवर सादर केला जाईल याचीही काळजी घेण्यात येत असते. प्रचाराच्या वाहनांना, सभांना, प्रचारसाहित्याला अधिकाऱ्यांची परवानगी घेणे, पक्षाच्या मुख्य कार्यालयाशी, तेथील नेत्यांशी संपर्कात राहणे, निरोपांची देवाणघेवाण करणे यासाठीही उमेदवारांनी या गोष्टींची माहिती असलेले खास कार्यकर्ते तयार केले आहेत. पक्षीय उमेदवारांच्या चार जणांच्या पॅनेलसाठी अशी एक मोठी फळीच राबत आहे. पक्ष असलेल्या काही उमेदवारांनीही याच पद्धतीने प्रचार चालविला असल्याचे दिसते आहे. प्रभागात स्वतंत्रपणे फिरणे सुरू असते. ग्रुप तयार करून केलेला असा प्रचार प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आल्याने बऱ्याच उमेदवारांनी त्याचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे.
कॉर्पोरेट प्रचाराचा नवा फंडा
By admin | Updated: February 12, 2017 05:05 IST