असा न व्हावा ‘दहावा’ कधी...

By Admin | Updated: August 11, 2014 04:06 IST2014-08-11T04:06:15+5:302014-08-11T04:06:15+5:30

माळीण दुर्घटनेत १५१ जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. १०) माळीण फाट्यावर होणार आहे

Never be the 'tenth' ever ... | असा न व्हावा ‘दहावा’ कधी...

असा न व्हावा ‘दहावा’ कधी...

घोडेगाव : माळीण दुर्घटनेत १५१ जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. १०) माळीण फाट्यावर होणार आहे. एकाच वेळी एवढ्या मृतांचा दशक्रिया विधी होण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असेल. विधीसाठी या सर्वांचे एकच पिंड बनविले जाणार असून, या कार्यक्रमास सुमारे ८ ते १० हजार लोक येतील असा अंदाज आहे.
३० जुुलै रोजी माळीण दुर्घटना घडली. तेव्हा आठ दिवस मदतकार्य सुरू होते. या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. जेव्हा शेवटचा मृतदेह बाहेर निघेल व हे मदतकार्य थांबेल तेव्हा दशक्रिया विधीची तारीख ठरवू, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी (दि. ६) मदतकार्य पूर्ण झाले व ग्रामस्थांनीच दि. १० रोजी सामूहिक दश्क्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व प्रशासनाचे सर्वच विभाग करत आहेत.
माळीण गावातील शाळेपासून दशक्रियेसाठी नागरिक निघतील व माळीण फाट्यावर दशक्रिया विधी होईल. या वेळी डिंभे येथील वैभवमहाराज राक्षे यांचे प्रवचन होणार असून, सर्व मृतांचे एकच पिंड बनवून दशक्रिया विधी होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व विधिवत धार्मिक विधी होणार असल्याचेपांडुरंगमहाराज येवले यांनी सांगितले आहे. दशक्रिया विधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय जमणार हे पाहून माळीण फाट्याकडे येण्यासाठी डिंभे ते अडिवरे व तळेघर ते माळीण फाटा असे दोन रस्ते तयार करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांना डिंभे ते अडिवरे या रस्त्याने येथे पोहचता येईल व जाताना तळेघर मार्गे सोडले जाणार आहे. दशक्रिया विधीला येण्यासाठी कोणालाही अडवले जाणार नाही. वाहनतळामध्येच गाड्या लावाव्यात, रस्त्याच्या कडेला गाड्या लावू नयेत. डिंभे ते अडिवरे हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूककोंडी होते. येणाऱ्या लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी
केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Never be the 'tenth' ever ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.