सुरक्षेबाबत हलगर्जीपणा; मंडळांना पोलिसांच्या नोटिसा
By Admin | Updated: September 8, 2014 04:01 IST2014-09-08T04:01:53+5:302014-09-08T04:01:53+5:30
गणेशोत्सवादरम्यान गणेश मूर्तीच्या, तसेच देखाव्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मंडळांना स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.

सुरक्षेबाबत हलगर्जीपणा; मंडळांना पोलिसांच्या नोटिसा
लक्ष्मण मोरे, पुणे
गणेशोत्सवादरम्यान गणेश मूर्तीच्या, तसेच देखाव्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मंडळांना स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १३१ मंडळांना अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) चंद्रशेखर दैठणकर यांनी ‘परवाना रद्द का करण्यात येऊ नये,’ अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत.
हडपसरसह शहराच्या काही भागांत झालेल्या जातीय तणावामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक संवेदनशील बनला होता. परंतु, पोलिसांनी खूप आधीपासूनच नियोजन करून सर्व धर्मीयांच्या बैठका घेऊन, तसेच नागरिकांशी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला होता. त्याचा परिणाम संपूर्ण गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळाला. गेल्या दहा दिवसांत कुठेही कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे हा गणेशोत्सव शांततेत आणि सौहार्दात पार पडला. पोलिसांनी केलेल्या नियोजनाचा गणेशोत्सवात मोठा प्रभाव पाहायला मिळाला.
पोलिसांनी गणेश मंडळांना मंडपाभोवती सुरक्षा ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच, मूर्तीची सुरक्षा आणि भाविकांची सुरक्षा याकरिता १० ते १५ स्वयंसेवक नेमण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. कोणी अफवा पसरवणार नाही, बेवारस वस्तू ठेवणार नाही, याची काळजी घेऊन दिवसा ४ व रात्री ५ स्वयंसेवक मंडळ परिसरात नेमण्यासाठी सांगण्यात आले होते. तर, मंडळाभोवती पुरेसी प्रकाश व्यवस्थाही करण्यात यावी,असेही पोलिसांनी बजावले होते. अतिरिक्त आयुक्त दैठणकर यांनी दक्षिण विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना गेल्या आठवड्याभरात अचानक बाहेर पडून मंडळ तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या नोटिशींना अद्याप मंडळांकडून उत्तरे मिळालेली नसली, तरीदेखील पोलिसांकडून त्याचा पाठपुरावा सुरू राहणार आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मात्र मंडळांच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिशीला नेमके काय उत्तर द्यावे, हेच सुधरेनासे झाले आहे.