अनधिकृत फलकांचे जाळे
By Admin | Updated: November 17, 2016 03:56 IST2016-11-17T03:56:31+5:302016-11-17T03:56:31+5:30
सध्या संपूर्ण पुणे शहरात शहराचे बकालीकरण करणाऱ्या, अनधिकृत फलक लावणाऱ्या राजकीय, तसेच व्यवसायिक व्यक्तींविरोधात पालिकेने मोहीम उघडलेली आहे.

अनधिकृत फलकांचे जाळे
बिबवेवाडी : सध्या संपूर्ण पुणे शहरात शहराचे बकालीकरण करणाऱ्या, अनधिकृत फलक लावणाऱ्या राजकीय, तसेच व्यवसायिक व्यक्तींविरोधात पालिकेने मोहीम उघडलेली आहे. मात्र, बिबवेवाडी परिसरामध्ये आयुक्तांच्या बहुतेक आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे.
स्वारगेट, लक्ष्मीनारायण चौक, सिटीप्राईड चौक, मार्केट यार्ड परिसर, गंगाधाम चौक, पुष्पमंगल चौक, महाराष्ट्र बँक चौक, महेश सोसायटी चौक, डॉल्फेन चौक, व्ही. आय. टी चौक, अंबामाता चौक यांसह अनेक ठिकाणी अनधिकृत फलके लावून शहाराचे बकालीकरण केले जात आहे. तसेच महानगरपालिकेचा महसूलदेखील बुडवला जात आहे.
पालिकेने हा महसूल गोळा करण्यासाठी किंवा हा महसूल वाढण्यासाठी ज्या आकाशचिन्ह विभागाची स्थापना केली आहे, त्या अधिकाऱ्यांनाच हे अनधिकृत फलक दिसत नाहीत. बिबवेवाडी भागातील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी मात्र आपल्याला कोणी जाब विचारणार नाही, या विश्वासावर त्यांचे कार्य चालु आहे. सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडत आहे. आयुक्तांनी तातडीने या भागातील अधिकाऱ्यांना जाब विचारून बकाल बिबवेवाडी स्वच्छ करावी, अशी मागणी या भागातील सामान्य जनता करीत आहे.