नेटबँकिंगने औषधविक्रेत्यांना गंडविले
By Admin | Updated: January 8, 2015 23:07 IST2015-01-08T23:07:14+5:302015-01-08T23:07:14+5:30
नववर्षाच्या प्रारंभीच नेटबँकिंगच्या माध्यमातून जुन्नरकर नागरिकांना आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न सायबर चाचांनी केला आहे.

नेटबँकिंगने औषधविक्रेत्यांना गंडविले
लेण्याद्री : नववर्षाच्या प्रारंभीच नेटबँकिंगच्या माध्यमातून जुन्नरकर नागरिकांना आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न सायबर चाचांनी केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांना त्यांच्या एटीएम कार्डच्या रजिस्ट्रेशनचा बहाणा करून बोलण्यात गुंतवून पिन नंबर काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारची विचारणा मोबाईल फोनच्या माध्यमातून जुन्नरमधील जवळपास २० ते २५ जणांना करण्यात आली, तर अनवधनाने एटीएम कार्डचा पिन नंबर सांगून टाकणाऱ्या एका औषधविक्रेत्यांला ९ हजार रुपयांचा फटका बसला.
कॅनरा बँकेच्या जयपूर येथील वरिष्ठ कार्यालयातून बोलत असल्याचा फोन या औषधविक्रेत्याला आला. तुमच्या एटीएम कार्डचे रजिस्ट्रेशन बँकेने रद्द केले असून, त्या संदर्भात पिन नंबरची विचारणा त्यांना करण्यात आली. या औषधविक्रेत्याने नुकतेच महिनाभरापूर्वीच बँकेचे एटीएम कार्ड काढले होते. पिन नंबर विचारला असता, सावधपणे औषधविक्रेत्याने फोन करणाऱ्या व्यक्तीला पिन नंबर सांगण्यास नकार दिला. यानंतर ‘एटीएमच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही २२२२ नंबर घ्या, त्यात ५४४७ नंबर मिळवा, त्यानंतर मग तुमचा पिन नंबर टाका व एकत्रित बेरीज करून आम्हाला सांगा,’ असे औषधविक्रेत्याला सांगण्यात आले. त्याने वरील दोन संख्या व पिन नंबरच्या संख्येची बेरीज करून फोनकर्त्याला सांगितली. परंतु, यानंतर मात्र लगेचच एकूण सांगितलेल्या बेरजेतून फोनकर्त्यांनी सांगितलेली संख्या वजा केल्यास पिन नंबर मिळणार असल्याचे या औषधविक्रेत्याच्या लक्षत आले. हा धोका लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब १० मिनिटांत बँकेच्या स्थानिक शाखेत धाव घेतली व झालेला प्रकार कथन करून त्यांचे खाते ब्लॉक करण्याची सूचना बँकेच्या कर्मचाऱ्याला केली; परंतु खाते ब्लॉक करेपर्यंतच्या कालावधीत नेटबँकिंगच्या माध्यमातून त्याच्या खात्यावरील ९ हजार रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्याने सदर खाते ब्लॉक केले. या खात्यात जवळपास ७५ हजार रुपये शिल्लक होते. त्यानंतरदेखील दिवसभरात या औषधविक्रेत्याच्या घरातील व्यक्तींच्या मोबाईलवर अशाच प्रकारचे एटीएमसंदर्भात फोन आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच या औषधविक्रेत्याला ‘तुम्ही एटीएम कार्ड बंद केला का?’ असा फोन आला होता. तर, दिवसभरात जुन्नर शहरातील जवळपास २० ते २५ जणांना अशा प्रकारचे फोन करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या औषधविक्रेत्याचा अपवाद वगळता कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. नेटबँकिंगच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याने बँकेच्या स्थानिक शाखेने वरिष्ठ कार्यालयाकडे याची माहिती दिल्याचे या औषधविक्रेत्याने सांगितले.
४दिवसभरात जुन्नर शहरातील जवळपास २० ते २५ जणांना अशा प्रकारचे फोन करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या औषधविक्रेत्याचा अपवाद वगळता कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.