नेपाळी टोळीकडून ६५ तोळे सोने जप्त
By Admin | Updated: February 23, 2017 03:29 IST2017-02-23T03:29:16+5:302017-02-23T03:29:16+5:30
चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकाने बाणेर-बालेवाडी भागामध्ये घरफोड्या करणाऱ्या

नेपाळी टोळीकडून ६५ तोळे सोने जप्त
पुणे : चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकाने बाणेर-बालेवाडी भागामध्ये घरफोड्या करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या नेपाळी टोळीला गजाआड केले आहे. त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांतील ६ किलो चांदी आणि ६५ तोळे सोने हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती परिमंडल तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दीपक ऊर्फ गुरू रंगनाथ जोशी (वय ३३, रा.पालघर), सागर देवराज ख्याती (वय ३३, रा.पिंपरी), पदमबहादूर लच्छीबहादूर शाही (वय ४३, रा. भोसरी), जगत कालू शाही (वय ३५, रा. वाकड), जनक गोरख शाही (वय ४०, रा. काळेवाडी) आणि गगन ऊर्फ काल्या कोपुरे कामी (वय २७, रा. बालेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण मूळचे नेपाळचे राहणारे आहेत. पोलिसांनी निरापद सुदर्शन दास (वय ५४, रा. पालघर) व एकेंद्र प्रसाद नाथ (वय ३७) या सराफांना अटक केली आहे.
आरोपी पुण्यामध्ये विविध सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. यातील काल्या हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्याने नोव्हेंबर २०१६ ते जानेवारीदरम्यान केलेले पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. काही जण मुख्य रस्त्यावर थांबून देखरेख करायचे, तर काही जण सोसायटीच्या आवारात थांबायचे. उर्वरीत सर्वजण घरफोडी करण्यासाठी जात असत. तपासादरम्यान २३ लाख २२ हजार ६०० किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)