वाङ्यीन पत्रव्यवहाराच्या अभ्यासाकडे समीक्षेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:32+5:302021-08-24T04:15:32+5:30
पुणे : पाश्चात्य जगात पत्रव्यवहाराला विलक्षण महत्त्व आहे. लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक परिस्थिती यांचे अनोखे दर्शन पत्रव्यवहारातून घडत असते. ...

वाङ्यीन पत्रव्यवहाराच्या अभ्यासाकडे समीक्षेचे दुर्लक्ष
पुणे : पाश्चात्य जगात पत्रव्यवहाराला विलक्षण महत्त्व आहे. लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक परिस्थिती यांचे अनोखे दर्शन पत्रव्यवहारातून घडत असते. पत्रव्यवहारासंदर्भातल्या अभ्यासाकडे मराठी साहित्य समीक्षेने दुर्लक्ष केले, अशी खंत ज्येष्ठ लेखिका आणि भाषा अभ्यासक डॉ. अंजली सोमण यांनी व्यक्त केली.
डॉ. सोमण यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी, पराग जोगळेकर आणि उज्ज्वला जोगळेकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. सोमण म्हणाल्या, 'गं. बा. सरदार यांनी मला साहित्याच्या सामाजिक अभ्यासाची गरज लक्षात आणून दिली. समाजाशी जिवंत संबंध असावा म्हणून मी स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, युक्रांद अशा चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मला समकालीन प्रश्नांचे भान आले. माझे सर्जनशील तसेच समीक्षालेखन साहित्याचा सामाजिक अंगाने विचार करणारेच आहे.
कोत्तापल्ले म्हणाले, 'पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या लेखनाकडे दुर्लक्ष झाले. कलावंतांनी अपेक्षा न ठेवता निर्मिती करावी. ज्ञानाला सामोरे जाण्याची वृत्ती कमी होत चालली आहे.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘संस्थात्मक कार्याकडे पाहण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन आणि साहित्य क्षेत्रांतील प्रतिसादशून्यता चिंताजनक आहे. डॉ. जोगळेकर यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला.'
प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.