महिलांच्या सुरक्षेकडे कंपन्यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: May 10, 2017 03:55 IST2017-05-10T03:55:52+5:302017-05-10T03:55:52+5:30
गेली अनेक वर्षे आम्ही महिलांच्या सुरक्षेसंदर्भात काम करतो आहोत. आयटी कंपन्या हा सेक्टर अलीकडे निर्माण झाला. या कंपन्या

महिलांच्या सुरक्षेकडे कंपन्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेली अनेक वर्षे आम्ही महिलांच्या सुरक्षेसंदर्भात काम करतो आहोत. आयटी कंपन्या हा सेक्टर अलीकडे निर्माण झाला. या कंपन्या सुरक्षेच्या संदर्भात आपल्याकडील महिला कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेत नाही, असे माझे निरिक्षण आहे. सरकारने कायदे बनवले आहेत, नियम केले आहेत, पण ते कधीही पाळले जात नाहीत. या कंपन्यांकडील कँटिन सुविधा, ड्रायव्हिंग सेवा, स्वच्छता अशा सर्व गोष्टींसाठी ठेकेदार कंपन्यांकडून कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेतले जातात. योगेश राऊत हा गुन्हेगार स्थानिक होता, पण बहुतेकदा या कंपन्यांकडचे हे कर्मचारी बाहेरचेच असतात. त्यांचे नाव, पत्ता, पार्श्वभूमी याची काहीही माहिती कंपनीकडे नसते. त्यातूनच हे प्रकार होत असल्याचे मत आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, कंपन्यांना सुरक्षेसंबधीचे, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबधीचे सर्व नियम पाळणे सक्तीचे केले पाहिजे. अशा गोष्टींसाठी सरकारने एखादी स्वतंत्र यंत्रणाही करायला हरकत नाही. तसेच सर्वसाधारण कामांसाठी स्थानिक बेरोजगार युवकांना त्यांची पात्रता पाहून संधी दिली पाहिजे. सर्वांची नजिकच्या पोलिस ठाण्यात सविस्तर माहिती उपलब्ध असली पाहिजे. असे केले तरी बरेच काही साध्य होईल असे मला वाटते. महिलांकडे पाहण्याचा, त्यातही कर्मचारी महिलांकडे पाहण्याचा उनाडक्या करणाऱ्यांचा दृष्टिकोन फारसा चांगला राहिलेला नाही. त्यातच मोबाईलवर सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या अश्लिल साईटस्ही त्यांना अशी कृत्ये करायला प्रवृत्त करतात. दारू प्यायली की मग त्यांना कसले भान रहात नाही.