राज्यातील सामाजिक उपक्रमांसाठी नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार, ८३ लाखांचा विकास निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:01 PM2017-09-12T23:01:55+5:302017-09-12T23:01:55+5:30
शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आणि विधानपरिषदेतील प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक उपक्रम व प्रकल्पांना सन २०१७-१८ च्या आमदार विकास निधीच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यात पुढाकार घेतला आहे.
पुणे, दि. 12 - शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आणि विधानपरिषदेतील प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक उपक्रम व प्रकल्पांना सन २०१७-१८ च्या आमदार विकास निधीच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी ही घोषणा केली.
राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आदी भागातील शिवसेना पदाधिकारी, विधान मंडळ सदस्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कामांकरिता आ. डॉ. गोऱ्हे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. यामध्ये सामाजिक सभागृहे, व्यायामशाळा, वारकरी भवन, वारीच्या मार्गावरील कामे, प्राथमिक शाळांना प्रकल्प साहित्य, मंदिर परिसर सुशोभिकरण अशा विविध समाजविकास कामांचा समावेश होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार व संमतीने आ. डॉ. गोऱ्हे यांनी एकूण ८३ लाख रुपयांचा आमदार विकास निधी निधी जाहीर केला आहे. विविध सामाजिक उपक्रम व विकास कामांना त्या आपला आमदार विकास निधी देत असतात. याही वेळी मागणी करणारे आमदार व शिवसेना पदाधिकारी यांना याबाबत पत्रे देण्यात आलेली आहेत.
देण्यात आलेल्या निधीचे विभागवार वितरण पुढीलप्रमाणे : पुणे शहर व जिल्ह्यात शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख श्री. दत्तात्रय टेमघरे यांच्या मागणीनुसार मु.पो.काशिंग ता.मुळशी, जि.पुणे येथे डांबरीकरण कामासाठी – एकूण ५ लक्ष रुपये निधी दिला आहे तर शिवसेना पुणे मनपा सदस्य सौ.पल्लवी जावळे यांच्या मागणीनुसार पुणे शहरात महिला व पुरुष व्यायामशाळा तसेच सार्वजनिक वाचनालयासाठी – एकूण ५ लक्ष रुपये निधी दिला आहे.
कोल्हापूर शहर परिसरात आमदार राजेश क्षीरसागरमागणीनुसार कोल्हापूर शहरातील खालील कामांसाठी एकूण १० लक्ष रु. निधी दिला असून बजाप माजगावकर तालीम या मंडळांना व्यायाम साहित्य पुरविणे या कामासाठी ५ लक्ष रुपये आणि रंकाळावेश तालीम या मंडळांना व्यायाम साहित्य पुरविणे या कामासाठी ५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी आ. उल्हास पाटील यांच्या मागणीनुसार कवठे गुलंद, ता. शिरोळ, ता. कोल्हापूर येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी रुपये ५ लक्ष निधी देण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात संत तुकाराम महाराजांची पालखी मुकाम असणाऱ्या मौजे पिराची कुरोली, जि.सोलापूर येथे शिवसेना पदाधिकारी श्री राहुल पाटील यांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी एकूण रुपये ११ लक्ष इतका निधी देऊ केला आहे.
सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाच्या पालखी मुकामी असणाऱ्या मौजे मुंजवडी तसेच हणमंतवाडी ता.फलटण, जि.सातारा येथे शिवसेना पदाधिकारी श्री राहुल देशमुख यांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी एकूण १२ लक्ष रु निधी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातही आ.श्री राजाभाऊ वाजे यांच्या मागणीनुसार सिन्नर शहरात वारकरी भवन उभारण्यासाठी एकूण ९ लक्ष रु निधी दिला आहे. तर नांदेड जिल्ह्यात आ.श्री सुभाष साबणे यांच्या मागणीनुसार ता. बिलोली, जि.नांदेड येथे रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटकरण करण्यासाठी एकूण १० लक्ष रु निधी देण्यात आला आहे.
रायगडमध्ये शिवसेना नेते मा. श्री. लीलाधरजी डाके यांनी सुचविल्यानुसार पेण तालुक्यातील मौजे जिते गावच्या जिल्हापरिषद शाळेत ई - क्लास रूम करिता ५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. त्याचसोबत श्री. किशोर जैन रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या मागणीनुसार मौजे शेतपळस येथील आकादेवी मंदिर सुशोभीकरणासाठी एकूण ५ लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात आ. रुपेश म्हात्रे यांच्या मागणीनुसार भादवड, ता. भिवंडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात हायमास्ट दिवे बसविण्याकरिता ६ लाख रुपयांचा निधी दिला आहे. याप्रमाणे आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सन २०१७-१८ मधील आमदार विकास निधीतून एकूण विकास निधी ८३ लक्ष रु. चे वितरण करणात आले आहे.