‘नकोशी’ होतेय हवीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 01:30 IST2015-07-10T01:30:51+5:302015-07-10T01:30:51+5:30

‘आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको?’ हा प्रश्न जिल्ह्यातील ग्रामस्थांना पटू लागला असून, ‘नकोशी’ आता हवीहवीशी होऊ लागली आहे.

Needed to be 'wanting' | ‘नकोशी’ होतेय हवीशी

‘नकोशी’ होतेय हवीशी

बापू बैैलकर,  पुणे
‘आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको?’ हा प्रश्न जिल्ह्यातील ग्रामस्थांना पटू लागला असून, ‘नकोशी’ आता हवीहवीशी होऊ लागली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत स्त्रीजन्माचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, ते हजारांमागे ९०० पर्यंत गेले आहे. मागास व दुर्गम अशा वेल्हे तालुक्यात तर हे प्रमाण ११६० वर गेले आहे, हे विशेष.
गेल्या काही वर्षांत स्त्रीभ्रूणहत्या हा विषय ऐरणीवर आला आहे. मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाचा पुणे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. महाराष्ट्रात हजारामागे ८९४ असे प्रमाण असताना जिल्ह्यात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ते सरासरी ९०० पर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात १ कोटी ३३ लाख २६ हजार ५१५ इतक्या बालकांचा जन्म झाला. त्यांत ७० लाख ३५ हजार ३९१ मुले, तर ६२ लाख ९१ हजार १२६ मुलींचा जन्म झाला. याचे लिंग गुणोत्तर प्रमाण हे ८९४ इतके आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पुणे जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांत १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत ४९ हजार १९९ बालकांचा जन्म झाला असून, त्यांत २५ हजार ८९७ मुले व २३ हजार ३०२ मुलींचा समावेश आहे. हे लिंग गणोत्तर प्रमाण ९०० इतके आहे.
२०१२-१३मध्ये हे प्रमाण जिल्ह्यात ८९४ तर २०१३-१४मध्ये ८८७ इतके होते. ते आता ९००पर्यंत गेले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमुळे हे शक्य झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
एका मुलीची हत्या झाली तर जगातील मुलगी, बहीण, आई, वहिनी, काकू, मामी, आत्या, मैत्रीण, पुतणी, भाची, शिक्षिका, पत्नी व आजी अशी नाती नष्ट होतील, हे पटवून देण्यात आरोग्य विभाग यशस्वी होत असल्याचे दिसून येते. यासाठी आरोग्य विभाग गरोदर मातांची नोंदणी १२ आठवड्यांच्या आत एम.सी.टी.एस. सॉफ्टवेअरद्वारे करतो. मातेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नियमित पाठपुरावा केला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दरमहा २ गरोदर माता शिबिरांचे आयोजन केले जाते.
नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी कार्यक्षेत्रातील मातांना संस्थेत प्रसूती झाल्यास मातृत्व अनुदान योजनेतून ४०० रुपये रोख दिले जातात. जननी सुरक्षा योजनेत दारिद्र्यरेषेखालील व अनूसूचित जाती-जमातींमधील मातेची घरी प्रसूती झाल्यास ५०० रुपये व मानांकित संस्थेत प्रसूती झाल्यास ७०० रुपये दिले जातात. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेत दारिद्र्यरेषेखालील जोडप्याला १ किंवा २ मुली आहेत, त्यांना १० हजार रुपये प्रोत्साहनात्मक बक्षीस दिले जाते. या नवीन वर्षात ‘स्त्रीजन्माचे स्वागत’ ही नवी योजना जिल्हा परिषद राबवत आहे. या सर्वांचा सकारामत्क परिणाम जिल्ह्यात दिसू लागला आहे. यात दुर्गम व मागास समजला जाणारा वेल्हा तालुका आघाडीवर आहे. तेथे वर्षभरात २५७ बालकांचा जन्म झाला असून त्यांत १३८ मुली व ११९ मुले, असे ११६० गुणोत्तराचे प्रमाण आहे. मावळमध्ये ९६१, जुन्नरमध्ये ९२५, हवेलीत ९२२, मुळशीत ९०५ तर दौंडमध्ये ९०३ इतके प्रमाण आहे. पुरंदर तालुक्यात मात्र हे प्रमाण ८३१ असून ते जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. त्यानंतर बारामतीतही ८४३ इतकेच प्रमाण आहे.
---------
पुरंदर, बारामती, शिरूर या तालुक्यात लिंगगुणोत्तराचे प्रमाण अजूनही समाधानकारक नाही. हे वाढविण्यासाठी या पुढील काळात प्रयत्न करणार आहोत. जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद निधीतून पुढील काळात काही नवीन योजना आणता येतील का, याचाही विचार केला जाईल- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
----------
> ११६०वेल्हे तालुक्यातील लिंग गुणोत्तराचे हे प्रमाण प्रशंसनीय आहे.

> ८३१ एवढ्या जिल्ह्यात सर्वांत कमी प्रमाण आहे.

> २000 जिल्हा परिषदेने या वर्षीपासून ‘स्त्रीजन्माचे स्वागत’ असा उपक्रम हाती घेतला असून, १ जुलै २0१५ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या मातेस स्त्री अपत्य झाले, तर त्या अपत्याच्या नावावर २ हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

Web Title: Needed to be 'wanting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.