स्वत:ला सिद्ध करण्याची गरज
By Admin | Updated: September 5, 2015 03:17 IST2015-09-05T03:17:51+5:302015-09-05T03:17:51+5:30
नकला अनेक जण अनेकांच्या करतात. मी कुणाचीही नक्कल कधी केली नाही. राजकारण असो वा चित्रपट, कुठल्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न व्हायला हवा

स्वत:ला सिद्ध करण्याची गरज
पुणे : नकला अनेक जण अनेकांच्या करतात. मी कुणाचीही नक्कल कधी केली नाही. राजकारण असो वा चित्रपट, कुठल्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे मत खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले.
तिसऱ्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे उद्घाटन यशदा येथे शुक्रवारी सिन्हा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ‘युअर्स ट्रुली : शत्रुघ्न सिन्हा’ या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका भारती प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
‘ग्लोबल इमेज आॅफ इंडिया’ या विषयावर यंदाचा फेस्टिव्हल आयोजिण्यात आला आहे. डॉ. नील हॉलिंडर, सबिना संघवी, एमआयटी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, फेस्टिव्हलच्या आयोजक डॉ. मंजिरी प्रभू, विश्वकर्मा पब्लिकेशनचे भरत अग्रवाल, सिद्धार्थ जैन, बिपिनचंद्र प्रभू व्यासपीठावर उपस्थित होते. मुलाखतीत बोलताना सिन्हा म्हणाले, ‘‘बायोग्राफीचा विषय अनेक वर्षांपासून होता, पण हे काम कुणाकडे सोपवावे, अशी विश्वासार्ह व्यक्ती सापडत नव्हती. चित्रपट, राजकारणातील बायोग्राफीतून तरुणांच्या हाती काही लागावे हीसुद्धा अपेक्षा आहे. आपल्याला ना चित्रपटाची पार्श्वभूमी आहे ना राजकारणाची. सामाजिक जबाबदारीतून या दोन्ही भूमिका बजावत आलो आहे. कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असला तरी इतरांसाठी प्रेरणास्रोत म्हणून पुुढे आले पाहिजे.’’
एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘राजकारणातील जयप्रकाश नारायण आणि चित्रपटातील राजकपूर हे आपले आदर्श आहेत. कुठल्याही क्षेत्रात असलो तरी स्वत:ला सिद्ध करावे लागते. जोश उपयोगाचा नाही.’’
राजकारणात जायचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी मतमतांतरे व्यक्त केली. राजकारणात जाऊन पैसा कमवायचा आहे का, असा प्रश्न सुभाष घई यांनी विचारला होता. आवडत्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी स्वत्व सोडून चालत नाही, असे सिन्हा म्हणाले.
फेस्टिव्हलचे उद्घाटन सिन्हा यांनी दीपप्रज्वलन करून केले. त्यानंतर ते मंचावर न थांबता मंचासमोरील मान्यवरांमध्ये येऊन बसले होते. हा धागा पकडून ‘आपले विचार आम्हाला ऐकायचे आहेत’, असे प्रा. राहुल कराड म्हणाले असता, ‘मै यहाँ सबको सुनने आया हूँ’ असे सांगून पुन्हा मंचावर जाण्यास विनम्र शब्दांत नकार दिला.
या वेळी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वत:च्या नावाची स्टोरी सांगितली. चित्रपट क्षेत्रात येताना नावाबद्दल उत्सुकता असते. शत्रुघ्नप्रसाद सिन्हा हे आपले पूर्ण नाव. पण नावातून प्रसाद हटविले. एस. पी. सिन्हा रिटायर्ड केले. उत्तरेत, दक्षिणेत इतकेच काय पण पाकिस्तानात गेल्यावर आपल्या नावाचा उल्लेख कसा होतो, हे त्यांनी स्वत:चे नाव उच्चारून दाखविले. ‘गुजरात के बारे में जादा बात नही कर सकते’ असे सांगताच सभागृहात हशा पिकाला. पण अखेरीस ‘काम चलेगा तो नाम भी चलेगा’ हे त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यात फेस्टिव्हलच्या आयोजक मंजिरी प्रभू यांनी फेस्टिव्हल आयोजनामागील भूमिका विषद केली. भरत अग्रवाल म्हणाले, ‘‘पुण्यात नववने प्रयोग राबविले जातात. अशा उपक्रमांचा निश्चितच उपयोग होतो.’’ सबिना संघवी म्हणाल्या, की तरुणवर्ग वाचनाकडे वळल्यास त्यांना निश्चितच उपयोग होईल. महोत्सवाला पुणेकरांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा सिद्धार्थ जैन यांनी व्यक्त केली. प्रा. राहुल कराड म्हणाले, की अनेक उपक्रमांमधून पुण्याने खूप चांगले विचार दिले आहेत. अनेक उपक्रमांची सुरुवात पुण्यातूनच झाली आहे. त्याचा उपयोग झाला. (प्रतिनिधी)