नवी राजकीय व्यवस्था हवी
By Admin | Updated: January 23, 2017 03:08 IST2017-01-23T03:08:24+5:302017-01-23T03:08:24+5:30
समाजवादी सरकारवर टीका खूप करतात, पण परिवर्तनाचे काम कोण करणार? आपल्या विचारांचे सरकार कधी येणार, याची

नवी राजकीय व्यवस्था हवी
पुणे : समाजवादी सरकारवर टीका खूप करतात, पण परिवर्तनाचे काम कोण करणार? आपल्या विचारांचे सरकार कधी येणार, याची वाट न पाहता नव्या राजकीय व्यवस्थेसाठी जनतेचा सहभाग घ्या, संघर्ष करा, सरकारवर दबाव आणणारी ताकद व्हा, असा संदेश ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारिख यांनी रविवारी येथे दिला.
अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलनाच्या समारोपामध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. येथील सानेगुरुजी स्मारकाच्या परिसरात दोन दिवस सुरू असलेल्या संमेलनामध्ये नवे समाजवादी युवा पथक निर्माण करण्याचा निश्चय झाला. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय संकटांच्या विविध पैलूंवर देशभरातील आघाडीचे कार्यकर्ते, विचारवंत सहभागी झाले होते. समारोपाच्या सत्रामध्ये सोशॅलिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रेमसिंह, मध्य प्रदेशातील कार्यकर्ते डॉ. सुनीलम, समाजवादी नेते डॉ. अभिजित वैद्य, युसूफ मेहरअली युवा बिरादरीच्या गुड्डी व्यासपीठावर होत्या. देशभरातील ५९ संघटनांचे सुमारे ३०० प्रतिनिधी संमेलनासाठी उपस्थित होते.
डॉ. प्रेमसिंह म्हणाले, ‘‘नवसाम्राज्यवादाचे अपत्य म्हणजे सध्याची हुकूमशाही. नवउदारमतवाद सुरूच राहिला, तर लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकशाही संपविण्याचे प्रयत्न देशात गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहेत. धर्मनिरपेक्ष पक्ष भाजपाला साथ देण्याचे वाढते प्रकार देशभर सुरू आहेत. अशा पक्षांना रोखण्याची जबाबदारी मुस्लिमांवर आहे.’’
डॉ. सुनीलम म्हणाले, ‘‘राष्ट्रसेवा दलाला ८२ वर्षांचा इतिहास आहे. समाजवादी व्यासपीठाच्या स्थापनेच्या वेळी जयप्रकाश नारायण यांच्यापासून अरुणा असफअलीपर्यंत १०० युवक होते. आज नवी सुरुवात करताना ३०० कार्यकर्ते एकत्र आले आहेत, ते खूप काही करू शकतात. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध लढण्याचा संकल्प करून युवकांनी स्वत:चे समाजवादीपण सिद्ध क रावे.’’
डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘समाजवादाला आधुनिक स्वरूप देण्याची गरज आहे. आजपर्यंत राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते तयार करत राहिले आणि बाहेर जाऊन कार्यकर्ते वेगवेगळी बिरादरी तयार करीत राहिले. लोकतांत्रिक समाजवादाची प्रक्रिया चालविणाऱ्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांनी राहिले पाहिजे. उजव्या विचारधारेचे राजकारण रोखण्याची ताकद याच समाजवादी विचारधारेत आहे.’’
गुड्डी यांनी सूत्रसंचालन केले. भाषणांदरम्यान जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारोंसे, चप्पा चप्पा गुंज उठेगा आझादी के नारोंसे अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून
गेले होते.