भामा-आसखेडसाठी निधीची आवश्यकता
By Admin | Updated: October 19, 2015 02:04 IST2015-10-19T02:04:37+5:302015-10-19T02:04:37+5:30
जेएनएनयूआरएम अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भामा-आसखेड पाइपलाइनचे काम आता अमृत योजनेअंतर्गत पूर्ण केले जाणार आहे

भामा-आसखेडसाठी निधीची आवश्यकता
पुणे : जेएनएनयूआरएम अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भामा-आसखेड पाइपलाइनचे काम आता अमृत योजनेअंतर्गत पूर्ण केले जाणार आहे. मात्र, अमृत योजनेमध्ये केंद्र शासनाकडून मिळणारा निधी कमी केल्याने त्यासाठी पालिकेला आता विविध पर्यायांचा शोध घेऊन निधी उभारावा लागणार आहे.
नगर रस्ता परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भामा आसखेड धरणातून थेट पाइपलाइन आणली जात आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत याचे काम केले जात असताना केंद्र शासनाकडून ५० टक्के, राज्य शासन ३० टक्के निधी देणार होते, उर्वरित केवळ २० टक्क्यांची रक्कम पालिकेला भरावी लागणार होती. मात्र, हा प्रकल्प अमृत योजनेमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याने महापालिकेला ५० टक्के खर्चाचा वाटा उचलावा लागणार आहे. ज्या प्रकल्पासांठी केंद्राने पहिला हप्ता दिला आहे, त्याच प्रकल्पांचा समावेश अमृत योजनेमध्ये करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे अमृत योजनेमध्ये पालिकेचे भामा-आसखेड व वडगाव या दोन प्रकल्पांचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर पालिकेकडून अमृत योजनेसाठी नव्यानेही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. अमृत योजनेमध्ये पाणी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.