भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची विजयाची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: February 24, 2017 02:16 IST2017-02-24T02:16:27+5:302017-02-24T02:16:27+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँॅग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कारी-उत्रौली गटातील

भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची विजयाची हॅट्ट्रिक
भोर : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँॅग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कारी-उत्रौली गटातील तीनही जागा जिंकून राष्ट्रवादीने मोठ्या फरकाने एकहाती विजय मिळवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तर राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला नसरापूूर- भोलावडे गट काँग्रेसने ताब्यात घेतला आहे. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर चार जागा जिंकून भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आयटीआय येथे १० वाजता मतमोजणी सुरू झाली. या वेळी निकाल ऐकण्यासाठी बाहेर मोठ्या प्रमाणात समर्थकांनी एकच गर्दी केली होती. गटाची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात आली.
वेळू-नसरापूर गटातून शिवसेनेचे विद्यमान सदस्य कुलदीप कोंडे यांच्या पत्नी शलाका कोंडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवून ३२११ मतांनी राष्ट्रवादीच्या सुनीता बाठे यांच्यावर विजय मिळवला. तर वेळू गणात शिवसेनेचे विद्यमान पंचायत समिती सदस्य अमोल पांगारे यांच्या पत्नी पूनम पांगारे व काँग्रेसच्या रेश्मा पांगारे यांच्यात दहाव्या फेरीपर्यंत मतदान बरोबरीत सुरू होते.
मात्र, शेवटच्या फेरीत पूनम पांगारे यांना कुरुंगवडी व केळवडे गावात आघाडी मिळाल्याने शिवसेनेच्या पूनम पांगारे ११०३ मतांनी विजयी झाल्या. तर भोंगवली गणातून सुरवातील काँग्रेसचे रोहन बाठे व शिवसेनेचे विकास चव्हाण यांच्यात लढत झाली. मात्र, शेवटी राष्ट्रवादीचे मनोज निगडे व रोहन बाठे यांच्यात लढत होऊन बाठे यांनी ७२२ मतांनी विजय मिळवला.
नसरापूर-भोलावडे गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही या वेळी युवक काँॅग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल आवाळे यांनी राष्ट्रवादीचे कुणाल साळुंके यांच्यावर १६६२ मतांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचा गड सर केला. नसरापूर गणात राष्ट्रवादीचे लह शेलार व काँॅग्रेसचे संतोष सोंडकर यांच्यात लढत होऊन शेलार यांनी १८६१ मतांनी विजय मिळवला, तर भोलावडे गणात राष्ट्रवादीच्या मंगल बोडके यांनी सुरवातीपासून आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवून त्यांनी काँग्रेसच्या भारती वरखडे यांच्यावर ७६० मतांनी विजय मिळवला. या गटात मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान झाले आहे.
उत्रौली-कारी गट हा काँॅग्रेसचा बालेकिल्ला असून, येथून राष्ट्रवादीचे माजी सभापती रणजित शिवतरे सुरवातीपासून नीरा-देवघर धरण भागात, आंबवडे व वीसगावतही आपली आघाडी शेवटपर्यंत टिकवून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या गीतांजली आंबवले यांचे पती आणि काँॅग्रेसचे उमेदवार आनंद आंबवले यांच्यावर शिवतरे यांनी तब्बल ५,९९५ इतक्या मोठ्या फरकाने एकहाती विजय मिळवत काँॅग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.
कारी गणातून राष्ट्रवादीच्या दमयंती जाधव यांनी काँग्रेसच्या रुक्मिनी घोलप यांच्यावर ३००९ इतक्या मोठ्या फरकाने एकहाती विजय मिळवला, तर उत्रौली गण हा काँॅग्रेसचा बालेकिल्ला असून, या गणात आत्तापर्यंत एकदाही राष्ट्रवादीला विजय मिळवता आला नव्हता. मात्र, या वेळी दरवेळी पराभूत होण्याची परंपरा खंडित करीत राष्ट्रवादीच्या श्रीधर किंद्रे यांनी काँग्रेसचे अनिल सावले यांच्यावर २४७७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. (वार्ताहर)