बारामतीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
By Admin | Updated: February 24, 2017 02:07 IST2017-02-24T02:07:15+5:302017-02-24T02:07:15+5:30
बारामती तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक

बारामतीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
बारामती : बारामती तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले. भाजपाने निवडणूक प्रचाराच्या काळात तीन गटांत चांगलीच आघाडी घेतली होती. त्यामुळे तालुक्यात भाजपाला संधी मिळणार, अशी चर्चा होती. परंतु, सुपा-मेडद वगळता अन्य कोणत्याही गटात लढत दिसली नाही. या गटातील सुपा गणातदेखील चुरशीची लढत झाली. परंतु, २९९ मतांनी राष्ट्रवादीला विजय मिळविता आला. हा अपवाद वगळता अन्य सर्व गट, गणांत भाजपाचे पानिपत झाले. ६ गट आणि १२ पंचायत समिती गणाच्या जागा राष्ट्रवादीने एकहाती जिंकल्या.
बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात पहिल्यांदाच भाजपाने तगडे आव्हान दिल्याने मतमोजणीची उत्सुकता वाढली होती. बारामती एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात आले. टपाली मतेदेखील राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली.
दरम्यान, तालुक्यातील तीन गटांमध्ये भाजपाला विजयाची संधी होती. सुपा-मेडद, माळेगाव-पणदरे आणि सांगवी-डोर्लेवाडी या गटावर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. परंतु, निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते विचार करण्यासारखी आहेत.
भाजपाला माळेगाव-पणदरे गटात एकाही बूथवर मताधिक्य मिळालेले नाही, असे होऊच शकत नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील ईव्हीएम मशीन तपासावी, यासाठी लेखी तक्रार केली असल्याचे रंजनकुमार तावरे यांनी सांगितले. तांत्रिक दोष असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पंचायत समिती सुपा गणात राष्ट्रवादीच्या नीता संजय बारवकर विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या मंगल कौले यांचा पराभव केला. या गणात चुरशीची लढत झाली. अटीतटीच्या लढतीत नीता बारवकर यांचा २९९ मतांनी विजय झाला. या गणात अपक्ष महिला उमेदवाराने मिळविलेल्या १६६४ मतांमुळे बराच फरक पडला.
तर मेडद गटात राष्ट्रवादीच्या शारदा राजेंद्र खराडे यांनी ३७१९ मताधिक्य मिळवून विजय मिळवला. सुपा-मेडद गट आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागांसह गटावर वर्चस्व कायम राखले. मागच्या निवडणुकीत गमावलेली सुपा गणाची जागा पुन्हा मिळविली.
माळेगाव- पणदरे गटातून राष्ट्रवादीच्या रोहिणी तावरे यांनी भाजपा नेते तथा माळेगाव कारखान्याचे चेअरमन रंजनकुमार तावरे यांच्या पत्नी विजयाताई तावरे यांचा तब्बल ९ हजार १७२ मतांनी पराभव केला. माळेगाव गणात संजय पंडित भोसले यांनी ५४२२ मतांनी रुपेश सायबू भोसले या भाजपा उमेदवाराचा पराभव केला. पणदरे गणातून रोहित बळवंत कोकरे ३७९१ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपाचे सदाशिव कोकरे यांचा पराभव केला.
मोरगाव-वडगाव निंबाळकर गटात अनपेक्षितरीत्या चुरस निर्माण झाली. या गटात राष्ट्रवादीचे विश्वासराव देवकाते, भाजपाचे माणिक काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे बंडखोर सुनील भगत, सुनील ढोले यांच्यात लढत होती. अपक्ष सुनील भगत यांचा ५ हजार ६५६ मतांनी पराभव झाला. भगत यांना वडगाव निंबाळकर गणातून चांगली मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. दुसऱ्या फेरीत मोरगाव गणातील मते मोजल्यावर निर्णायक आघाडी मिळवून विश्वासराव देवकाते विजयी झाले. तर वडगाव निंबाळकर गणातून राष्ट्रवादीचे प्रदीप तुकाराम धापटे यांनी भाजपाचे सुनील नारायण माने यांच्यावर ५ हजार ६५९ इतके मताधिक्य घेऊन विजय मिळवला. मोरगाव गणातून राहुल दत्तात्रय भापकर यांनी भाजपाचे संजय भोसले यांचा ६ हजार ८६० मतांनी पराभव केला.
डोर्लेवाडी-सांगवी गटात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची सून अश्विनी युवराज तावरे या निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे भाजपाने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र मतपेटीत त्यांचे भाग्य उजळले नाही. या गटात राष्ट्रवादीच्या मीनाक्षी किरण तावरे यांनी भाजपाच्या अश्विनी तावरे यांचा ६ हजार ३७ मतांनी पराभव केला.
सांगवी गणातून राष्ट्रवादीच्या अबोली रतनकुमार भोसले यांनी भाजपाच्या सारिका भोसले यांचा २ हजार ५९४ मतांनी पराभव केला. डोर्लेवाडी गणात राहुल विठ्ठल झारगड यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांचा ३ हजार ४८८ मतांनी पराभव केला. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील माळेगाव-पणदरे आणि डोर्लेवाडी-सांगवी या दोन्ही गटांत भाजपाच्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. (प्रतिनिधी)
विजयाची खात्री होती पण...
४सुपा-मेडद, माळेगाव-पणदरे आणि डोर्लेवाडी- सांगवी या गटाकडे लक्ष वेधले होते. या तिन्ही गटांत भाजपाला विजयाची खात्री होती. चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्या घरातील उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. सुपा-मेडद गटामध्ये २५ गावे आणि वाड्या-वस्त्या मिळून मोठा जिल्हा परिषद गट असल्याने पहिल्यांदा मतमोजणी सुरू करण्यात आली.
४पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत खैरे यांनी जवळपास ६०० मतांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु झाली. त्यामध्येदेखील आघाडी घेत राष्ट्रवादीचे भरत खैरे यांनी २ हजार ३१५ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. या जागेवर भाजपाने प्रचार यंत्रणा जोरदार राबवली होत, परंतु गटातील सर्वच मतदान केंद्रनिहाय राष्ट्रवादीला आघाडी मिळाली.
४जिरायती भाग, सतत दुष्काळी परिस्थिती असताना आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंबहुना पवार घराण्याच्या पाठीशी राहतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. या गटात चुरस होईल, असे सुरुवातीपासून वातावरण होते. या गटातील मोठ्या गावांमध्ये राष्ट्रवादीला आघाडी मिळाली. त्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत खैरे यांनी बाजी मारली.
पवार कुटुंबातील चौथी पिढी जिल्ह्याच्या राजकारणात
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित राजेंद्र पवार यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी शिर्सुफळ-गुणवडी गटातून विक्रमी मतांनी विजय मिळविला. त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रोहीत पवार यांच्या माध्यमातून पवार कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात सक्रीय झाली. पवार कुटुंबातील सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळींनी दिलेले प्रोत्साहन, मतदारांनी ठिकठिकाणी केलेले स्वागत या विजयाचा आनंद द्विगुणित करून गेला, असे त्यांनी सांगितले. विक्रमी मतांनी विजयी केल्यामुळे या गटातील जबाबदारी वाढली आहे. ती निश्चितपणे पार पाडू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.