२0 वर्षांपासूनचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा कस
By Admin | Updated: February 18, 2017 02:26 IST2017-02-18T02:26:15+5:302017-02-18T02:26:15+5:30
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून बेलसर-माळशिरस

२0 वर्षांपासूनचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा कस
बेलसर-माळशिरस
जेजुरी : पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत असून बेलसर-माळशिरस गटात चौरंगी लढत होत आहे. यामुळे काँंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
या गटातून काँग्रेसने पंचायत समितीचे विद्यमान सदस्य दत्ता झुरंगे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गेली २० वर्षे हा गट ज्यांच्या ताब्यात असणारे माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे यांनी इथली उमेदवारी पुन्हा एकदा खेचून आणलेली आहे. तर राज्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेकडून अॅड. शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली आहे. भाजपानेही ग्रामीण भागातील पक्षाचा चेहरा म्हणून आधुनिक शेतीचे प्रणेते गणपत कड यांना निवडणुकीत उतरवले आहे. प्रथमाच चौरंगी लढत होत असल्याने निवडणुकीची संपूर्ण समीकरणेच बदललेली आहेत. यामुळे सर्वच पक्षनेतृत्वाचा येथे कस लागणार आहे. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार पूर्वीचे व आजचे पक्षांतर करणारेच आहेत.
या गटातील बेलसर गणातून काँग्रेसने सुनीता बाळासाहेब कोलते यांना तर सेनेने अश्विनी धीरज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तृप्ती नीलेश जगताप, तर भाजपाने पल्लवी कैलास जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे.
माळशिरस गणातून सोनाली कुलदीप यादव या काँग्रेसकडून, वर्षा किशोर खळदकर शिवसेनेकडून, तर मनीषा अरुण यादव या राष्ट्रवादीकडून आपले नशीब आजमावत आहेत. या गणात भाजपाने राष्ट्रवादीच्या नाराज उमेदवारला उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवाराने आयत्यावेळी माघार घेतल्याने येथे तिरंगी सामना होणार आहे.
बेलसर माळशिरस हा गट तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुदाम इंगळे यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेली २० वर्षे हा गट त्यांच्याच ताब्यात राहिलेला आहे. यावेळी प्रथमच त्यांना काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाकडून मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.
या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे गेल्या निवडणुकांत इंगळे यांच्या कन्या सारिका इंगळे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या तृप्ती जगताप या त्यांच्याबरोबर बेलसर गणातून निवडणूक लढवित आहेत. तर २००७ मध्ये स्वत: इंगळे यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढवलेल्या अरुण यादव यांच्या पत्नी मनीषा यादव यांना माळशिरस गणासाठी बरोबर घ्यावे लागलेले आहे. पूर्वीच्या दोन्ही बंडखोरांना बरोबर घेऊन निवडणुकीत सुदाम इंगळे उतरलेले आहेत. शिवाय घराणेशाहीचा आरोपही त्यांच्यावर होत आहे.
काँग्रेसचे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य दत्तात्रय झुरंगे या युवा नेत्याला निवडणुकीत उतरवले असून निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश देऊन तालुक्यातील वकील शिवाजी कोलते यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मागे राज्यमंत्र्यांची ताकद आहे. शिवाय या निवडणुकीसाठी इछुक असणारे व उमेदवारी डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी सेनेच्या उमेदवारलाच विजयी करण्याचा चंग बांधल्याने निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे विजय कोलते यांनी समर्थनच केलेले आहे. मात्र विजय शिवतारे आणि सुदाम इंगळे यांचे राजकीय संबध पाहता मतदारांकडून अनेक शंका व्यक्त होत आहेत.
तर भाजपाचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे खंदे समर्थक आणि आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते गणपत कड यांनी निवडणुकीची सारीच समीकरणे बिघडवली आहेत. (वार्ताहर)