राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेत फेरबदल
By Admin | Updated: April 11, 2015 05:22 IST2015-04-11T05:22:15+5:302015-04-11T05:22:15+5:30
महापालिकेतील राष्ट्रवादीचे सभागृहनेते सुभाष जगताप यांनी पदाचा राजीनामा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे शुक्रवारी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेत फेरबदल
पुणे : महापालिकेतील राष्ट्रवादीचे सभागृहनेते सुभाष जगताप यांनी पदाचा राजीनामा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे शुक्रवारी दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, सभागृहनेते पदासाठी नगरसेवक दिलीप बराटे व बंडू केमसे इच्छुक आहेत. परंतु, ऐन वेळी काही युवा चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी एक वर्ष अगोदर सुभाष जगताप यांच्याकडे सभागृहनेते पदाचा पदभार देण्यात आला. निवडणुकीनंतर सलग तीन वर्षे त्यांनी सभागृहनेते म्हणून कामकाज पाहिले. महापालिकेत स्पष्ट बहुमत नसताना काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी मेट्रो, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नाट्यगृहे, सिमेंट रस्ते व भूसंपादनाचे अनेक विषय मार्गी लावले. मात्र, पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सुभाष जगताप यांनी सभागृहनेते पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज राजीनामा दिला. दरम्यान, सभागृहनेते पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. नगरसेवक बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे, बंडू केमसे, बाळासाहेब बोडके यांची नावे चर्चेत आहेत. तसेच युवा चेहरा म्हणून नगरसेवक विशाल तांबे, चेतन तुपे व प्रशांत जगताप यांची नावे ऐन वेळी पुढे येण्याची चर्चा आहे.