पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या फेसबूक पेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या वतीने खडक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. हे फेसबूक पेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आहे. सातत्याने त्यावर असा मजकूर प्रसिद्ध होत असल्याने ही तक्रार करण्यात आली.राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्ष मनाली भिलारे यांनी ही माहिती दिली. 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' असे या पेजचे नाव आहे. या नावाला साजेसा असा मजकूर त्यावर मुळीच येत नाही, मात्र अशा प्रकारच्या मजकूरामुळेच त्या पेजला असंख्य फॉलोअर्स आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातेही आहे. तरीही ते याची दखल घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे फिर्याद करून त्यांच्या लक्षात ही बाब आणून देत आहे असे भिलारे यांनी सांगितले. मजकूराबरोबरच पेजवर अत्यंत घाणेरडी छायाचित्रेही असतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या छायाचित्रांवर अन्य छायाचित्रे टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच भारतीय दंड संहिता १८६० या अधिनियमाअंतर्गत कलम ५०९ व ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० याअंतर्गत कलम ६६(उ) व कलम ६७ अन्वये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्यासाठी ही फिर्याद दाखल केली आहे असे भिलारे यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक राजेंद्र केशवराव मोकाशी यांनी फिर्याद स्वीकारून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील तपास निरीक्षक संभाजी रामचंद्र यांच्याकडे सोपवला. पोलिसांकडून याची योग्य दखल घेऊन तपास केला जाईल व दोषींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास भिलारे यांनी व्यक्त केला.
आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या फेसबूक पेजविरोधात राष्ट्रवादी युवती सेलने केला एफआयआर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 18:24 IST
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या फेसबूक पेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या वतीने खडक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या फेसबूक पेजविरोधात राष्ट्रवादी युवती सेलने केला एफआयआर दाखल
ठळक मुद्दे'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' असे या पेजचे नावराष्ट्रवादीच्या नेत्यांच्या छायाचित्रांवर अन्य छायाचित्रे टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न