राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरूच
By Admin | Updated: May 24, 2016 05:53 IST2016-05-24T05:53:33+5:302016-05-24T05:53:33+5:30
भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहरे फोडण्यास सुरुवात केली आहे. माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शरद बोऱ्हाडे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरूच
पिंपरी : भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहरे फोडण्यास सुरुवात केली आहे. माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शरद बोऱ्हाडे आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भरत लांडगे हे भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला पहिला सुरुंग लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पुण्यात बैठक घेतली होती. त्या वेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, माजी उपसभापती सविता खुळे, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसच्या नगरसेविका आरती चोंधे यांचे पती सुरेश चोंधे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक व राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे, विद्यमान नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेष तापकीर, राम वाकडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्यही भाजपाने आपल्या गोटात दाखल करून घेतले आहेत. मात्र, सरळसरळ प्रवेश करूनही राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने जाहीरपणे वक्तव्य केलेले नाही. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला दोनदा शह देण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक व माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत लांडगे यांना भाजपात घेतले आहे. मुंबईतील भाजपाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. या वेळी शहराध्यक्ष, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार उपस्थित होते.
यानंतर कोणचा नंबर लागणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहरे फोडण्याच्या दृष्टीने भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. चिंचवडमधील काही जणांनी दहा दिवसांपूर्वी प्रवेश केला. भोसरी विधानसभेतील दोन पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. पिंपरीतील कोण भाजपात जाणार, याबाबत चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज भाजपामध्ये प्रवेश करतील असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.