इच्छुकांना डावलून राष्ट्रवादीची खेळी
By Admin | Updated: January 23, 2017 02:34 IST2017-01-23T02:34:49+5:302017-01-23T02:34:49+5:30
जिल्हा परिषदेच्या निंबूत-करंजेपूल गटातील निवडणुकीचे वातावरण गेल्या महिनाभरापासून ढवळून निघाले आहे. दोन वर्षांपूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या

इच्छुकांना डावलून राष्ट्रवादीची खेळी
सोमेश्वरनगर : जिल्हा परिषदेच्या निंबूत-करंजेपूल गटातील निवडणुकीचे वातावरण गेल्या महिनाभरापासून ढवळून निघाले आहे. दोन वर्षांपूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविलेले प्रमोद काकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे येथील वेगळे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी नुकतेच माळेगाव कारखान्यावर आंदोलन केले होते. त्याला देखील या नव्या समीकरणाचे झालर असल्याची चर्चा आहे.
वाघळवाडी-मुर्टी गट आणि गणाची रचना बदलून ती निंबूत-करंजेपूल अशी करण्यात आली आहे. निंबूत गणात वाघळवाडी, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, मुरूम, वाणेवाडी ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. तर करंजेपूल गणात करंजे, चौधरवाडी, मगरवाडी, वाकी, सोरटेवाडी, होळ, कोऱ्हाळे खु, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, लाटे व शिरष्णे अशी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण वर्गासाठी खुले आहे. निंबूत गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर करंजेपूल गणासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. यासाठी सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडल्याने राष्ट्रवादी पक्षाकडे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांची संख्यादेखील जास्त आहे.
विरोधक म्हणून कारखाना निवडणुकीत लढलेले प्रमोद काकडे यांना राजकीय तडजोड म्हणून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे इच्छुक १२ जणांपैकी कोणाही एकाला उमेदवारी द्या, तसे न केल्यास आम्ही पक्षाचे काम करणार नसल्याचे काही इच्छुकांनी स्पष्ट केले होते. मात्र, राष्ट्रवादी पक्षाने अखेर प्रमोद काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी वाढली आहे.
या दरम्यान काकडे कुटुंबातील भाऊबंदकीच्या बैठका पार पडल्या आहेत. पक्षातीलच नाराज उमेदवारांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी अगोदरच पक्षश्रेष्ठींनी लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या चार-पाच इच्छुकांनी भाजपाकडे उमेदवारी मागीतली असल्याचे भाजपाचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी सांगितले. उमेदवारी न मिळालेल्या उमदवारांचे समर्थक यांच्यात कमालीची नाराजी आहे. त्यांची ही नाराजी मतदानापर्यंत टिकणार की पक्षश्रेष्ठी यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.