खेडमध्ये राष्ट्रवादीच्या अनिल राक्षे यांची माघार
By Admin | Updated: February 14, 2017 01:45 IST2017-02-14T01:45:55+5:302017-02-14T01:45:55+5:30
निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सांडभोरवाडी-काळूस गटामध्ये राष्ट्रवादी काँगेसकडून इच्छुक असलेले अनिल (बाबा) राक्षे

खेडमध्ये राष्ट्रवादीच्या अनिल राक्षे यांची माघार
राजगुरुनगर : निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सांडभोरवाडी-काळूस गटामध्ये राष्ट्रवादी काँगेसकडून इच्छुक असलेले अनिल (बाबा) राक्षे यांनी सोमवारी अचानक माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होईल का, याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू झाली आहे.
अनिल राक्षे यांचे तिकीट कापून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी त्यांचे समर्थक अरुण थिगळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. त्यामुळे गेले चार दिवस अनिल राक्षे बंडखोरी करतात का, याची चर्चा तालुक्यामध्ये सुरू होती.
यासंदर्भात राक्षे म्हणाले, ‘‘मी अजित पवार यांना मानणारा
कार्यकर्ता आहे. पक्षहितासाठी
मी माघार घेतली आहे. यापूर्वी मी अपक्ष निवडून आलेलो असल्यामुळे मला ही निवडणूक अजिबात अवघड नव्हती.’’
राक्षेंच्या माघारीमुळे आता राष्ट्रवादीचे अरुण थिगळे व शिवसेनेचे बाबाजी काळे यांच्यामध्ये तीव्र चुरस होण्याची शक्यता आहे. भाजपानेही धनंजय गारगोटे यांना उमेदवारी दिली आहे. थिगळे व काळे हे सांडभोरवाडी गणातील एकाच भागातील आहेत. गारगोटे काळूस गणातील आहेत. त्यामुळे काळूस गणातून गारगोटेंना किती फायदा होईल, यावर दोन्हीही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहील.
दरम्यान, सांडभोरवाडी गणातून शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या सरपंच कविता पाचारणे यांनीही अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता या गणामध्ये राष्ट्रवादीच्या साळुबाई मांजरे, शिवसेनेच्या सुनीता सांडभोर, भाजपाच्या रूपाली चव्हाण, काँग्रेसच्या शुभांगी वाळूंज यांच्यात लढत होणार आहे.
काळूसमधून भाजपाच्या उमेदवार मीनाक्षी लोणारी यांनी माघार घेतल्याने तेथे शिवसेनेच्या ज्योती अरगडे आणि राष्ट्रवादीच्या सुरेखा टोपे यांच्यामध्ये चुरस होणार आहे. त्यामुळे या गटात व गणामध्ये सर्वच पक्षांचा व नेत्यांचा कस लागणार आहे.
आमदार सुरेश गोरे व माजी आमदार दिलीप मोहिते यांनी या गट व गणासाठी पक्षश्रेष्ठींकडून भांडून समर्थकांना उमेदवारी आणलेली आहे. त्यामुळे दोघांच्याही प्रतिष्ठेची निवडणूक या गट-गणांची झालेली आहे. (वार्ताहर)