पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा गजर
By Admin | Updated: January 20, 2015 00:56 IST2015-01-20T00:56:24+5:302015-01-20T00:56:24+5:30
महंमदवाडी प्रभाग क्र. ४५ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ९ हजार २५२ अशा भरघोस मतांनी विजयी झाला.

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा गजर
हडपसर : महंमदवाडी प्रभाग क्र. ४५ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ९ हजार २५२ अशा भरघोस मतांनी विजयी झाला. अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यातील गडावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे
वातावरण पसरले. शिवसेना-भाजपाचा धुव्वा, तर काँग्रेसची अनामत जप्त झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे फारूख इनामदार यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघ हडपसरचे अध्यक्ष मंगेश तुपे, चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, सुनील बनकर, प्रदीप मगर, डॉ. शंतनू जगदाळे उपस्थित होते.
या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाबरोबर स्थानिक अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे फारूख इनामदार- ९ हजार २५२, शिवसेनेचे जयसिंंग भानगिरे ६ हजार ८६५, अपक्ष संजय घुले ५ हजार ४१, भाजपाचे जीवन जाधव ३ हजार २४, तर काँग्रेसचे वैभव डांगमाळी यांना अवघी ७४८ मते मिळाली.
पहिल्या २ फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने आघाडी मिळविली, तर तिसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली. शिवसेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची, तर अपक्ष उमेदवार तिसरा आणि भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने मात्र माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी विधानसभेत पाचवा क्रमांक राखला तोच पाचवा क्रमांक राखण्याची परंपरा कायम राखली; त्यामुळे त्याची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.
‘अच्छे दिन आनेवाले हैं’ हा फॅक्टर चालला नाही. त्यामुळे भाजपाची हवा गुल झाली. आजी आमदारांच्या कारकिर्दीतील त्याच्या विधानसभा मतदारसंघातील ही पहिली निवडणूक होती. त्यात त्यांना मोठा झटका बसला आहे. आजी-माजी नगरसेवक आणि आमदारांनाही मतदारांनी स्पष्ट नाकारल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)
वाहतूककोंडी सोडविण्याबरोबर भुयारी मार्गाचे काम पहिल्यांदा तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. तसेच या परिसरात मोकाट जनावरांबरोबर डुकरांचा मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो, त्यांचाही बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरील दादागिरी आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मतदारांनी मतदान केले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. प्रभागाचा विशेष विकास केला जाईल. पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- फारूख इनामदार,
नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस