भाजपाच्या जाहीरनाम्यावर राष्ट्रवादी-शिवसेनेची टीका
By Admin | Updated: February 12, 2017 04:58 IST2017-02-12T04:58:09+5:302017-02-12T04:58:09+5:30
भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्याची कॉपीच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना

भाजपाच्या जाहीरनाम्यावर राष्ट्रवादी-शिवसेनेची टीका
पुणे : भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्याची कॉपीच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. स्मार्ट सिटीमध्ये पुणे महापालिकेला दुसरा क्रमांक मिळाल्याचे भाजपाने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामाला त्यांनी आपल्या जाहीरनाम्यातून दिलेले ते प्रमाणपत्रच आहे, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसने डिसेंबरमध्ये आपला जाहीरनामा प्रकाशित केला होता. त्यातलेच बहुतेक मुद्दे भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात घेतले असल्याचा आरोप करून चव्हाण म्हणाल्या,‘‘सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. आम्ही जी कामे केली तीच त्यांनी दिली आहेत. सत्तेच्या १० वर्षांच्या काळात राष्ट्रवादीने पुण्यात अनेक विकासकामे केली. पुढच्या ५ वर्षांत आम्ही काय करणार तेही आमच्या जाहीरनाम्यात दिले आहे.’’
प्रत्येक उमेदवाराने आपण काय केले व काय करणार, याचे एक व्हिजन तयार करून ते प्रकाशित करावे, असे आयोगाने म्हटले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची प्रत्येकी २ मिनिटांची एक फिल्म पक्षाच्या युवती शाखेच्या अध्यक्ष मनाली भिलारे यांनी तयार केली आहे. पक्षाच्याच पदाधिकारी शिल्पा भोसले यांनीही त्यात साह्य केले आहे. असे करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
आश्वासनांची कॉपी
पीएमपीने पुणेकरांना मोफत प्रवास करण्यासह विनामूल्य औषधोपचारांच्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची भाजपाने कॉपी केली आहे, असा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी शनिवारी केला. शिवसेनेतर्फे मतदारांना द्यावयाच्या प्रचारपत्रकांची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत निम्हण बोलत होते. ‘पुणे शहरावर धरणार छत्र विकासाचे’,’ती सध्या काय करते’,’ वाचा, विचार करा आणि थंड बसा’ या शीर्षकाच्या या पत्रकांचे वाटप घरोघर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.