‘राष्ट्रवादी’ खिळखिळी
By Admin | Updated: January 10, 2017 03:27 IST2017-01-10T03:27:07+5:302017-01-10T03:27:07+5:30
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपात प्रवेश केल्यानंतर

‘राष्ट्रवादी’ खिळखिळी
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपात प्रवेश केल्यानंतर लक्ष्मण जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शहराध्यक्ष झाले. भोसरी विधानसभा मतदारसंघात प्राबल्य राखण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा भाजपाप्रवेश झाला. त्यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी महापौर व शहराध्यक्ष आझम पानसरे यांचा भाजपप्रवेश घडवून आणल्याने महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला खिळखिळे करण्याची खेळी सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता असली, तरी हा पक्ष गटागटांत विभागलेला आहे. नेत्यांच्या पक्षादेशापेक्षा स्थानिक पातळीवरील व्यक्तिनिष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच जड गेलेली आहे. राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दराराही या पक्षातील गटांनी जुमानलेला नव्हता. महापालिकेतील सत्ता माजी आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, आझम पानसरे यांच्या गटांमध्ये विभागलेली होती. पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठेला महत्त्व होते. ज्यांचे प्राबल्य आहे, ज्या ताकदीवर राष्ट्रवादीचे राजकारण अवलंबून राहिले आहे.
केंद्र व राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीतील तुलबळ गटांची ताकद कमी करण्याची खेळी काही महिन्यांपासून सुरू केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचा एक-एक मोहरा गळाला लागत आहे. आमदार जगताप व लांडगे यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजविण्यास सुरुवात केली आहे.
(प्रतिनिधी)
पानसरे यांचे पुनर्वसन होणार कुठे?
४राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता असा शहरव्यापी चेहरा असलेले कोणीच नाही. मातब्बर आहेत; पंरतु ते त्यांच्या प्रभाग व परिसरापुरते मर्यादित आहेत. पानसरे यांच्या भाजपातील आगमनामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग, झोपडपट्ट्यांमधील सामान्य मतदार भाजपाकडे खेचला जाऊ शकतो. पानसरे यांना भाजपाकडून काय फायदा होणार, हे सद्य:स्थितीत स्पष्ट होत नाही.
४आतापर्यंत एकमेकांना कायम पाण्यात पाहणारे पानसरे आणि जगताप एकाच व्यासपीठावर आले. जगताप यांच्या अधिपत्याखाली पानसरे भाजपाचे काम करणार का? पानसरे यांना भाजपात आणल्याबद्दल आमदार जगताप, लांडगे यांना पक्षाकडून शाबासकीची थाप मिळेल; परंतु पानसरे यांचे करायचे काय? हा प्रश्न भाजपापुढे आहेच.