..तर महापालिकेमध्ये राष्ट्रवादी-मनसेचा नवा पॅटर्न ?
By Admin | Updated: March 5, 2015 00:26 IST2015-03-05T00:26:34+5:302015-03-05T00:26:34+5:30
प्रारुप विकास आराखड्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीत झालेल्या बिघाडीचा परिणाम स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निडणुकीवर गुरुवारी होणार आहे.
..तर महापालिकेमध्ये राष्ट्रवादी-मनसेचा नवा पॅटर्न ?
पुणे : प्रारुप विकास आराखड्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीत झालेल्या बिघाडीचा परिणाम स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निडणुकीवर गुरुवारी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागे न घेता राष्ट्रवादीने नाशिक महापालिकेतील पॅटर्नप्रमाणे मनसेची मदत घेण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आघाडी तुटण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी-मनसेचा नवीन पॅटर्न उदयाला येण्याची चर्चा आहे. त्यावर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अश्विनी कदम, चंद्रकांत कदम व मुक्ता टिळक यांचे भवितव्य ठरणार आहे.
फेब्रुवारी २०१२ च्या महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सत्तेसाठी एकत्र आली. त्यावेळी महापालिकेतील पंचवार्षिक सत्तेत महापौर, शिक्षण मंडळ अध्यक्ष व चार वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपमहापौर, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष व स्थायी समितीचे चौथे वर्षे काँग्रेसला देण्याचा अलिखित करार झाला होता. त्यानुसार महापालिकेत तीन वर्षे काँग्रेस आघाडीचा संसार सुरू होता.
लोकसभा निवडणूक एकत्र आघाडीने लढविल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीत काडीमोड झाला. तेव्हापासून महापालिकेत विविध विषयांवरून काँग्रेस आघाडीत धूसफूस सुरू
आहे. मात्र, विकास आराखडा मंजुरीमुळे दोघे एकत्र राहिले होते. परंतु, विकास आराखडा मंजुरीची मुख्यसभा आज तहकूब झाली. त्यामुळे दोन्ही पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीची मदत घेवून पुन्हा एकदा स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्ताने ‘पुणे पॅटर्न ’ करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट प्रयत्न करीत आहेत. मात्र, राष्ट्रवादी अद्याप चौथे वर्षे सोडण्यास तयार झालेली नाही.
काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची दोन दिवसांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षपदाला पाठिंबा देण्यासाठी भेट घेतली. परंतु, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी शब्द पाळला नाही.
या पूर्वानुभामुळे राष्ट्रवादी चौथ्या वर्षांसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास राजी झालेली नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ‘पुणे पॅटर्न’ व काँग्रेस ‘आघाडी’चा निर्णय बुधवारी सायंकाळीपर्यंत होवू शकला नाही. त्यामुळे महापालिकेत नाशिक पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कोणता पॅटर्न होणार यावर राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम, काँग्रेसचे चंद्रकांत कदम आणि भाजपकडून मुक्ता टिळक यांचे भवितव्य ठरणार आहे.
(प्रतिनिधी)
४नाशिक महापालिकेत मनसे व भाजपची सत्ता होती. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे मनसेची सत्ता धोक्यात आली होती. परंतु, राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यामुळे मनसेचा स्थायी समिती अध्यक्ष होवू शकला. आता राष्ट्रवादीला स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मदत करून त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे ६ आणि मनसेचे ३ सदस्य एकत्र आल्यास ‘नाशिक पॅटर्न’च्या धर्तीवर स्थायी समिती अध्यक्षपदी अश्विनी कदम यांची बहुमताने निवड होवू शकते.
असा पॅटर्न अन् असा अध्यक्ष...
४‘आघाडी’प्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र राहिल्यास : चंद्रकांत कदम
४‘पुणे पॅटर्न’प्रमाणे राष्ट्रवादी व भाजप एकत्र आल्यास : मुक्ता टिळक
४‘नाशिक पॅटर्न’प्रमाणे राष्ट्रवादी व मनसे एकत्र आल्यास : अश्विनी कदम
स्थायी समितीचे संख्याबळ
राष्ट्रवादी: ६
काँग्रेस : ३
मनसे: ३
भाजप: ३
शिवसेना: १
एकूण सदस्य: १६