राष्ट्रवादीचे सदस्य शालेय गणवेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:33 IST2017-08-02T03:33:31+5:302017-08-02T03:33:31+5:30
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्याचे वाटप होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत शालेय गणवेशात जाऊन आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे सदस्य शालेय गणवेशात
पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्याचे वाटप होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी स्थायी समितीच्या सभेत शालेय गणवेशात जाऊन आंदोलन केले. त्यांच्या मागणीची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला यासंबधी चौकशी करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी अशी त्वरित चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य महेंद्र पठारे, योगेश ससाणे, भय्यासाहेब जाधव या तीन सदस्यांनी शालेय गणवेश परिधान करीत स्थायी समितीच्या सभेत प्रवेश केला. सभा सुरू असतानाच त्यांनी सदस्यांना शालेय साहित्याचे नमुने दिले. दप्तर फाटलेले, वहीचा पुठ्ठा खराब झालेला, पानांवर शाई फुटत असलेली, रंगपेटीत रंगच नाही व खोडरबर वापरले की त्याचा भूगा होत असलेला. हे पाहून स्थायी समितीचे अध्यक्ष मोहोळही चकीत झाले. ठेकेदारांकडून विद्यार्थ्यांना सर्व शाळांमध्ये हेच साहित्य दिले जात असल्याची तक्रार पठारे, जाधव व ससाणे यांनी केली.
थेट लाभ योजनेत प्रशासनाने यावर्षी विद्यार्थ्यांना स्वाइप कार्ड दिली आहेत. प्रशासनाने निश्चित केलेल्या एकूण २९ दुकानदारांपैकी कोणत्याही दुकानात जाऊन पालकांनी आपल्या पाल्यासाठी शालेय साहित्य खरेदी करायचे आहे. या योजनेत काही ठेकेदारांनीच वर्चस्व मिळवले असून त्यांच्याकडूनच अन्य दुकानदारांना माल पुरवला जात आहे, असा आरोप यावेळी सदस्यांनी केला. तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांमधून नमुने जमा केले, सर्व ठिकाणी सारखेच साहित्य असून ते निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार त्यांनी जमा केलेले नमुने समितीत सादर करून केली.
मोहोळ यांनी आंदोलनाकांना सांगितले, की याबाबत आपण अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी याबाबत कल्पना देऊन चौकशी करण्यास सांगितले होते. आता सदस्यांनी आंदोलन केल्यानंतर तरी दखल घ्यावी, आयुक्तांनी यात लक्ष घालून चौकशी करावी, असा आदेश त्यांनी दिला. आयुक्तांनी त्वरित चौकशी करून अहवाल सादर करू, असे आश्वासन दिल्यानंतर ससाणे, पठारे, जाधव स्थायी समितीतून
बाहेर पडले.