राष्ट्रवादी आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2015 00:44 IST2015-08-07T00:44:14+5:302015-08-07T00:44:14+5:30
वेल्हे तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर आघाडी घेतली आहे

राष्ट्रवादी आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस पिछाडीवर गेली आहे.
वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप लोहकरे यांच्या ओसाडेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने बाजी मारली आहे. अंत्रोली येथील काँग्रेसचे युवक अध्यक्ष नाना राऊत यांचा पॅनल पराभूत झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष किरण राऊत यांचा पॅनल विजयी झाला.
जिल्हा परिषद सदस्या वसुधा अमोल नलावडे यांच्या निगडेमोसे गावात देखील काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला असून, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विंझर ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना धक्का देत मनसेने मुसंडी मारली आहे. माजी पंचायत समिती सदस्य संतोषअप्पा दसवडकर यांचे बंधू अण्णा दसवडकर यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. वेल्हे तालुक्याच्या राजकारणाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे कलाटणी मिळाली आहे. तालुक्यातील प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी जोर लावला होता. पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.
ओसाडे ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप लोहकरे यांना आपल्या गावातच पॅनलच्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वेल्हे तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद लोहकरे यांच्या पॅनलने बाजी मारली आहे.
तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या अंत्रोलीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे तालुकाध्यक्ष किरण राऊत यांच्या पॅनलने बाजी मारली असून, तालुका काँग्रेसचे युवक अध्यक्ष नाना राऊत पॅनलचा पराभव झाला आहे. वेल्हे पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असून, जिल्हा परिषद सदस्या वसुधा अमोल नलावडे यांच्या निगडेमोसे गावात देखील काँग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे. या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रेवणनाथ दारवटकर यांच्या पॅनलचा विजय झाला आहे.
विंझर ग्रामपंचायतीमध्ये वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता मोडीत काढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच उमेदवार निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांची काँग्रेसची परंपरा मोडीत काढली आहे. मालवली ग्रामपंचायतीमध्ये देखील काँग्रेसची सत्ता मोडीत काढली असून, या ठिकाणी मंगेश कोडीतकर, बापू जाधव यांनी बाजी मारली आहे. तर हिरपोडी, लाशिरगाव आणि मालवली येथील ग्रामपंचायतीवर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेवणनाथ दारवटकर ग्रुपने बाजी मारली आहे.
तर मार्गासनी ग्रामपंचायतीमध्ये देखील प्रस्थापितांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता मोडीत काढली आहे. रुळे ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून, या ठिकाणी राष्ट्रवादीला हार मानावी लागली आहे.