मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
By Admin | Updated: February 24, 2017 02:32 IST2017-02-24T02:32:46+5:302017-02-24T02:32:46+5:30
मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर

मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
पौड : मुळशी पंचायत समितीच्या ६ पैकी ४ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले, तर जि.प.गटात तीन पैकी १ जागा सेनेकडे, तर २ जागा राष्ट्रवादीकडे राहिल्या आहेत.
कासार आंबोली येथील सैनिकी शाळेत सकाळी बरोबर १० वाजता एकूण २८ टेबलवर सर्व गट गणाची एकाचवेळी सुरूझालेली मतमोजणी बरोबर ११.३० वाजता संपली.
२०१२ च्या निवडणुकीत पंचायत समितीत सहा पैकी ५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार, तर १ जागा काँग्रेस पक्षाकडे होती व जि.प. ३ गटांपैकी २ जागा राष्ट्रवादी, तर १ जागा सेनेकडे होती.
या वेळी शिवसेनेने पंचायत समितीत मुसंडी मारत १ जागा अधिक घेतली, तर जि.प.गटात १ जागा कायम ठेऊन आपला आलेख उंचावता ठेवला.
पौड-कासार-आंबोली गटात अनुसूचित जमातीचा शिवसेनेचा सर्वांत तरुण उमेदवार असलेला सागर काटकर याने सुरवातीपासून आघाडी घेत आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला. तर त्यापाठोपाठ बावधन -पिरंगुट गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शारदा ननावरे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली, परंतु अंतिम निकालात राष्ट्रवादीच्या अंजली कांबळे यांनी २१० मतांची आघाडी घेत बाजी मारली.
विशेष म्हणजे सुरवातीला शिवसेनेच्या शारदा ननावरे याच विजयी झाल्याचे सर्वत्र कळाले व बाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम निकालात अंजली कांबळे यांना विजयी घोषित केल्याने या आकस्मिक निकालाने तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पिरंगुट गणात आजी-माजी सभापतींच्या सौभाग्यवतींच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या राधिका कोंढरे यांनी विजयश्री संपादन केली. भाजपा, मनसे व अपक्षांना आपले खातेही खोलता आले नाही. (वार्ताहर)
माण- हिंजवडी गटात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी आपल्याबरोबर माण व हिंजवडी गणाच्या दोन्ही जागा खेचून आणत काँग्रेस व सेनेला धक्का दिला.
या निकालाने मुळशीत मतदारांनी राष्ट्रवादीने मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना, तर सेनेने मागील वर्षभरात केलेल्या संघटनात्मक बांधणीला कौल दिल्याचे स्पष्ट झाले.
मुळशीत मागील निवडणुकीत भाजपाचे तालुक्यात कोणतेही अस्तित्व नसताना या वेळी भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली, तर माण गट वगळता काँग्रेस सर्व ठिकाणी पिछाडीवर राहिली आहे.
या वेळी सर्वच पक्षांनी उमेदवार देताना घातलेल्या गोंधळामुळे आपल्याला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने तालुक्यातील तीन गटांत १३२०, तर सहा गणांत १०२३ अशा एकूण २३४३ मतदारांनी नोटा बटणाचा वापर केला.
विजयी झालेल्या उमेदवारांनी आपल्या गावी मिरवणुका काढून जल्लोष केला.