पुणे : शेतकरी कर्ज काढतात व ते माफ होईल याची वाट पाहत बसतात. नंतर त्या कर्जाच्या पैशातून साखरपुडा व लग्ने करतात, असे जाहीर वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सरकारचेच मत व्यक्त करीत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली. निवडणुकीआधी याच मंत्र्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले होते. याचीही आठवण राष्ट्रवादी काँग्रेसने कोकाटे यांनी करून दिली.
पक्षाचे राज्य प्रवक्ते सुनील माने म्हणाले, हा कोकाटे यांचा असंवेदनशीलपणा आहेच, पण ते ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्या सरकारचाही आहे. एक प्रकारे सरकारचेच मत त्यांनी बोलून दाखविले आहे. अवकाळी पावसाने झालेले शेतीचे नुकसान पाहणीसाठी गेलेले कृषिमंत्री दिवसभर बैठका घेतात, रात्री शेती पाहायला जातात व तिथे असे वक्तव्य करतात. कृषी खात्याचा इतका मोठा अवमान याआधी कोणीही केला नसेल.
कर्जमाफी करणार असे आश्वासन देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार एकीकडे शेतकऱ्यांना कसलीही कर्जमाफी मिळणार नाही. हप्ते जमा करायला सुरुवात करा असा दम देतात, तर दुसरीकडे त्यांचे कृषिमंत्री शेतकरी कर्जाचे पैसे साखरपुडा, लग्नासाठी वापरतात असे सांगत त्यांची चेष्टा करतात, असे मंत्री, उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले हे राज्यातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे असे माने यांनी म्हटले आहे.