दुर्लक्षित गडकोटांना भग्नावस्थेतून मिळतेय नवसंजीवनी
By Admin | Updated: October 11, 2015 04:22 IST2015-10-11T04:22:49+5:302015-10-11T04:22:49+5:30
प्रथम भटकंती... नंतर निरीक्षण... नंतर स्वच्छता... नंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संपूर्ण किल्ला पाहणे... त्यांना त्या किल्ल्याविषयी माहिती देणे...

दुर्लक्षित गडकोटांना भग्नावस्थेतून मिळतेय नवसंजीवनी
- अशोक खरात, खोडद
प्रथम भटकंती... नंतर निरीक्षण... नंतर स्वच्छता... नंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संपूर्ण किल्ला पाहणे... त्यांना त्या किल्ल्याविषयी माहिती देणे... त्यांच्या मनात दुर्गसंवधर्नाबाबत आत्मीयता निर्माण करणे आणि मग प्रत्यक्षात दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू करणे अशा प्रकारे आज दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम मोठ्या वेगाने राज्यभरात सुरू आहे. अनेक दुर्गप्रेमींचे हात दुर्गसंवर्धनाच्या कामामध्ये जोडले गेलेले आहेत.
शिवाजी ट्रेल या राज्यव्यापी दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने २० वर्षांपासून राज्यभरात दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू असून, त्या कार्यातून राज्यातील दुर्लक्षित व दुरवस्थेतील गडकोट किल्ल्यांना खऱ्या अर्थाने संजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ज्या परिसरात दुर्लक्षित व दुरवस्थेत गडकिल्ले आहेत, त्या परिसरातील स्थानिक तरुणांना एकत्र आणि सोबत घेऊन दुर्गसंवर्धनाचे काम केले जाते. ज्या गडकोट किल्ल्यांना शासनाकडून विकास निधी दिला जात नाही, अशांसाठी एक व्यापक जन चळवळच उभी केली जात आहे. राज्यातील दुर्गसंवर्धन चळवळीबाबत माहिती देताना संस्थेचे राज्याचे अध्यक्ष प्रा. मिलिंद क्षीरसागर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील दुर्गसंवर्धनास गती मिळावी, संवर्धनाच्या वाटेवर गडकोट यावेत, अधिकाधिक युवकांनी दुर्गसंवर्धनात सहभागी व्हावे यासाठी सुभा सातारा, सर्वेक्षण सुभा, वृक्षवल्ली सुभा अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सदाशिवगड, वर्धनगड, बारा मोटांची विहीर, पाटेश्वर मंदिरसमूह, कमानी हौद आणि मंगळवार तळे येथे नुकतीच पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले.
मुळशी तालुक्यातील घनगड किल्ल्यावर शिड्यांचे काम केले आहे. तिकोणा किल्ल्यावर पायरी मार्गाचे काम केले आहे. रायरेश्वर मंदिराचे पत्रे उडून त्यांची तूटफूट झाली होती, या मंदिरावर पुन्हा नवीन पत्रे टाकले. जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंडवर जाण्याचा मातीने पूर्णपणे गाडला गेलेला पायरी मार्ग शोधून काढला तसेच येथे रेलिंग बसविले तसेच पाण्याच्या टाक्या व वाडा मोकळा केला. किल्ले नारायणगडावरील मातीने गाडलेली पाण्याची टाकी मोकळी केली. येथील चोर दिंडी दरवाजा शोधून काढला व गडावरील राजवाड्याचा भाग मोकळा केला. किल्ले मल्हारगडावरही अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत.
गडकिल्ल्यावर असणाऱ्या वनस्पती, जैवविविधता आदी बाबींची फोटोंसह तपशीलवार माहिती संकलनाचे कामदेखील सुरू आहे. दुर्गसंवर्धन करताना स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संवर्धनाचे काम सुरू असलेल्या त्या-त्या गडकिल्ल्यांसाठी स्थानिक दुर्गसंवर्धन समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
दुर्गसंवर्धनाच्या कार्यात आतापर्यंत मनोज पवळे, विनायक खोत, मुकुंद उत्पात, सुजाता क्षीरसागर, माजी सैनिक रमेश खरमाळे, मनीष पुराणिक, सुजीत नेवले, प्रतीक तेली, सुमीत क्षीरसागर, स्वप्निल घनोटे, विजय कोल्हे, प्रभाकर कर्पे यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे.