व्यक्तिगत लोभानेच राष्ट्रवादी सोडली
By Admin | Updated: July 4, 2014 06:39 IST2014-07-04T06:39:42+5:302014-07-04T06:39:42+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकांना पदे दिली, मोठे केले. वेळप्रसंगी कुटुंबातील लोक ज्या भावनेने मागे उभे राहतात त्या भावनेने अडचणीच्या काळात पक्ष त्यांच्या पाठी उभा राहिला़

व्यक्तिगत लोभानेच राष्ट्रवादी सोडली
मंचर : राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकांना पदे दिली, मोठे केले. वेळप्रसंगी कुटुंबातील लोक ज्या भावनेने मागे उभे राहतात त्या भावनेने अडचणीच्या काळात पक्ष त्यांच्या पाठी उभा राहिला़ मात्र, व्यक्तिगत लोभापायी त्यांनी पक्ष सोडला असून, अरुण गिरे व शिवाजीराव ढोबळे यांना राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी केली़
मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित बैठकीत हिंगे बोलत होते़ विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते़
वळसे-पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘‘२५ वर्षे काही जण आपल्या सोबत राहिले़ मात्र, आता त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे़ कार्यकर्त्यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर मर्यादा सोडून टीका करू नये़ आपली ती संस्कृती नाही़’’
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंचर येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्ष सोडणार नाही, अशा आणाभाका घेणाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या़ त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी पुन्हा पुन्हा केली़ त्यांना परत कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊ नका, असे कार्यकर्त्यांनी ठासून सांगितले़ तसेच त्यांना धडा शिकविण्याचा निर्धार केला.
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, संचालक राम काळे, बाबासाहेब खालकर, सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती संजय गवारी, कार्याध्यक्ष बाबूराव दादा बांगर, ज्ञानेश्वर गावडे, सभापती प्रकाश घोलप आदी होते़ गणपतराव इंदोरे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)