राष्ट्रवादीच्या अपक्षांची माघार; नाराजी कायम
By Admin | Updated: February 14, 2017 01:45 IST2017-02-14T01:45:30+5:302017-02-14T01:45:30+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या चित्रानंतर राष्ट्रवादी जि. प. च्या ७, भाजपा ६, शिवसेना ५ तर काँग्रेस

राष्ट्रवादीच्या अपक्षांची माघार; नाराजी कायम
शिरूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या चित्रानंतर राष्ट्रवादी जि. प. च्या ७, भाजपा ६, शिवसेना ५ तर काँग्रेस ३ व अपक्ष ३ जागांवर आपली ताकद अजमावणार असल्याचे स्पष्ट झाले. एकमेव सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या शिरूर ग्रामीण-न्हावरे गटात राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी माघार घेतली. मात्र, ते पक्षाला मदत करणार नसल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
जि. प.च्या एकूण ७ जागांसाठी राष्ट्रवादीने शिरूर ग्रामीण-न्हावरे, रांजणगाव-सांडस, तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई- मांडवगण फराटा, रांजणगाव गणपती-कारेगाव, पाबळ-केंदूर व टाकळीहाजी-कवठेयेमाई या ७ गटांत आपले उमेदवार दिले. अर्जमाघारीनंतरचे चित्र पाहता, राष्ट्रवादी बंडखोरी रोखण्यात अपयशी झाल्याचे दिसून आले. मात्र, शिरूर ग्रामीण-न्हावरे गटात पक्षातील इच्छुकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले.
या गटासाठी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी आज आपला अर्ज माघारी घेतला. मात्र, पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पाच वर्षे युवक अध्यक्षपदी काम केले, तरीदेखील उमेदवारीसाठी विचार केला गेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिरूर ग्रामीण गणासाठी चव्हाणवाडीचे माजी सरपंच संतोष लंघे यांनी राष्ट्रवादीकडे मागणी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता; मात्र पक्षाने या गणात श्यामकांत वर्पे यांना उमेदवारी दिल्याने लंघे नाराज झाले. त्यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. त्यांची पत्नी पं.स.च्या उपसभापती मंगल लंघे यांनाही न्हावरे गणातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही. त्यांनीही आज अर्ज मागे घेतला.
मात्र, यामुळे नाराज झालेले लंघे यांनी पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांनी आज भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे यांची भेट घेतल्यचे समजते. कोरेकर व लंघे हे दोघे नेमकी काय भूमिका घेतात, तसेच राष्ट्रवादी या दोघांची नाराजी काढण्यात यशस्वी होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या गटात आमदार बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल यांची भाजपातर्फे उमेदवारी असून ही जागा खेचून आणण्याचा राष्ट्रवादीने निर्धार केला आहे. यामुळे नाराजांची नाराजी राष्ट्रवादीला काढावीच लागणार आहे.
शिरूर ग्रामीण-न्हावरे गटात जि.प.चे बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांनीही अर्ज दाखल केला होता; मात्र अपेक्षेप्रमाणे त्यांनी आज अर्ज मागे घेतला. त्यांनी अर्ज मागे घेतला असला, तरी या गटात ते पाचर्णेंच्या विजयासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे. कारण, त्यांचे आमदार पाचर्णेप्रेम सर्वश्रुत आहे.
बांदल यांची प्राथमिकता अर्थात आपली पत्नी रेखा बांदल यांना निवडून आणण्याला असेल, कारण रांजणगाव सांडस-तळेगाव ढमढेरे गटाची ही निवडणूक पैलवान बांदल यांच्यासाठी नेहमीसारखी सोपी नाही. त्यांच्या पत्नीच्या विरोधात दूध संघाचे संचालक बाळासाहेब ढमढेरे यांची स्नुषा संकिता ढमढेरे यांचे आव्हान आहे. या दोघींमध्येच सरळ लढत होईल. या गटात शिवसेना व दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.
शिक्रापूर-सणसवाडी गटात अखेर कुसुम खैरे यांचा भाजपाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. भाजपाचा एबी फॉर्म खैरे यांच्याबरोबरच गीता भुजबळ यांनाही देण्यात आला होता.
आज भुजबळ यांनी माघार घेतली. या गटात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी (कुसुम मांढरे) यांच्यात सरळ लढत होईल. या गटात शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार नाहीत. कारेगाव-रांजणगाव गणपती गटात माजी जि.प. सदस्य शेखर पाचुंदकर व जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या भावजय स्वाती पाचुंदकर यांच्याविरोधात भाजपातर्फे मनीषा पाचंगे यांची उमेदवारी आहे. पाचुंदकर यांची भगिनी ही आमदार पाचर्णे यांची स्नुषा आहे. मात्र, राजकारणात पाचुंदकर विरुद्ध पाचर्णे असेच चित्र पाहायला मिळते. पाचर्णे यांच्या उमेदवार मनीषा पाचंगे या स्वाती पाचुंदकरांच्या विरोधात आहेत. राष्ट्रवादीने ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे.
पाबळ-केंदूर गटात राष्ट्रवादीच्या सविता बगाटे, शिवसेनेच्या जयश्री पलांडे व भाजपाच्या मंगल शेळके, असा तिहेरी सामना पाहायला मिळेल. सध्या हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पलांडे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीला हा गट ताब्यात ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. शेळके यांची
उमेदवारीही स्ट्राँग आहे. त्यांचे पती भगवान शेळके हे विद्यमान पं.स. सदस्य आहेत. यामुळे या तिहेरी लढतीचा काय निकाल लागतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वैशाली दरेकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. (वार्ताहर)