पुणे महापालिकेत ‘नाशिक पॅटर्न’
By Admin | Updated: March 7, 2015 00:16 IST2015-03-07T00:16:18+5:302015-03-07T00:16:18+5:30
महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना ‘नाशिक पॅटर्न’च्या धर्तीवर मनसेच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने त्या विजयी झाल्या.

पुणे महापालिकेत ‘नाशिक पॅटर्न’
पुणे : महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना ‘नाशिक पॅटर्न’च्या धर्तीवर मनसेच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने त्या विजयी झाल्या. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेचा नवीन पॅटर्न उदयास आला असून, त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत.
महापालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन करताना काँग्रेसला एक वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचे ठरले होते. परंतु, चौथ्या वर्षाचे अध्यक्षपद देण्याचा आग्रह काँग्रेसने धरला होता. त्यानुसार काँग्रेसने स्थायी समितीसाठी माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुतणे चंद्रकांत कदम यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीनेही अश्विनी कदम यांना रिंंगणात उतरविले. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने नाशिक महापालिकेच्या धर्तीवर मनसेचा पाठिंबा घेण्याची तयारी केली. राष्ट्रवादीची ही चाल लक्षात आल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी गुरुवारी काँग्रेसची ऐनवेळी धावपळ झाली. राष्ट्रवादी व मनसे एकत्र आल्यास संख्याबळानुसार अश्विनी कदम यांचा विजय निश्चित होता. त्यामुळे निवडणुकीतील माघारीसाठी असलेल्या १५ मिनिटे मुदतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी स्थानिक नेत्यांनी चर्चा करून चंद्रकांत कदम यांना माघार घेण्यास भाग पाडले. अन् काँग्रेसनेही ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या नेत्यांची राष्ट्रवादीमागे झालेली फरफट चर्चेचा विषय बनली आहे.
‘डीपी’ मंजुरीवर पडसाद...
पुण्याचा प्रारूप विकास आराखडा मुख्यसभेपुढे आला आहे. त्यामध्ये आरक्षणावरून अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामध्ये महापालिकेत नाशिकच्या धर्तीवर राष्ट्रवादी व मनसेचा नवा पॅटर्न तयार झाला. आता बदललेल्या राजकीय समीकरणाचे पडसाद प्रारूप विकास आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेवर पडण्याची शक्यता आहे.