गावांच्या नावानुसार प्रभागांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 01:12 IST2016-09-08T01:12:59+5:302016-09-08T01:12:59+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३२ प्रभाग असणार आहेत. या प्रभागाची नावे ही प्रचलित गावांच्या नावानुसार असणार असून

गावांच्या नावानुसार प्रभागांची नावे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३२ प्रभाग असणार आहेत. या प्रभागाची नावे ही प्रचलित गावांच्या नावानुसार असणार असून, नावाचे वाद टाळण्यासाठी प्रभागांना क्रमांक द्यावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे. प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तीन सदस्यीय समितीला सादर केला आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ला होणार असून, निवडणूक कार्यक्रम, प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. बहुसदस्यीय चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांचा प्रारूप आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वाक्षरीने निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांनी प्रभाग प्रारूप आराखडा बुधवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सोपविला. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची त्रिसदस्यीय समिती आरक्षण तपासणी करून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव १२ सप्टेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहे.
चाचणी अयशस्वी
महापालिका प्रभागरचनेबाबत या वेळी गुगल अर्थचा वापर करून आराखडा तयार करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने सूचित केले होते. प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी नव्या करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगामार्फत सॉफ्टवेअर पुरविण्यात येणार होते.
मात्र, हा प्रयोग यशस्वी न झाल्याने महापालिकांकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेच्या आधारे नव्या प्रभागांची मांडणी करण्यात आली. प्रभाग रचनेची प्रक्रिया गुगल मॅप, प्रगणक गट, महाआॅनलाइनच्या संगणकीय प्रणालीचा आधार घेऊन केली आहे.
निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पारदर्शकपणे करण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात हे काम महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनीच केले. त्यांच्यावरही राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे काहींनी अनौपचारिकरीत्या बोलताना सांगितले.
महापालिकेत प्रभागरचनेची चर्चा
प्रारूप प्रभागरचनेचे काम सुरू झाल्याने महापालिकेत प्रारूप प्रभागरचनेची चर्चा आहे. आपला प्रभाग कसा आहे, याबाबत नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे निवडणूक विभागात येऊन कार्यकर्ते प्रभाग रचना झाली आहे का, याबाबतची माहिती घेत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)