पालिकेच्या तलावाला ठेकेदाराचे नाव

By Admin | Updated: May 25, 2015 05:56 IST2015-05-25T05:56:17+5:302015-05-25T05:56:17+5:30

महापालिकेचे जलतरण चालविण्यास दिलेल्या ठेकेदारांकडून नागरिकांकडून अवाजवी शुल्क उकळले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या जलतरण तलावाच्या

The name of the contractor for the municipal pool | पालिकेच्या तलावाला ठेकेदाराचे नाव

पालिकेच्या तलावाला ठेकेदाराचे नाव

पुणे : महापालिकेचे जलतरण चालविण्यास दिलेल्या ठेकेदारांकडून नागरिकांकडून अवाजवी शुल्क उकळले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या जलतरण तलावाच्या नावाचा बोर्ड काढून तो स्वत:च्या मालकीचा असल्याप्रमाणे स्वत:चा बोर्ड लावण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील ना. ग. नांदे जलतरण तलावाचे नाव परस्पर बदलून त्याठिकाणी ठेकेदाराने स्वत:चा बोर्ड लावला आहे.
नागरिकांना जलतरण तलावाची सुविधा किफायतशीर दरामध्ये उपलब्ध व्हावी, म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरामध्ये २१ जलतरण तलावांची उभारणी केली आहे. पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने खाजगी ठेकेदारांना ते चालविण्यासाठी दिले जातात. त्याचवेळी नागरिकांकडून किती शुल्क आकारायचे ते महापालिकेच्या मुख्य सभेने निश्चित करून दिले आहे. महिना ३५० रुपये किंवा प्रति तास २० रुपये शुल्क पोहण्यासाठी येणाऱ्यांकडून घ्यावेत, असा दर शहरातील सर्व जलतरण तलावांसाठी ठरविण्यात आला आहे. ठेकेदारांकडून त्यापेक्षा जास्त शुल्क उकळले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
जादा शुल्क उकळण्याबरोबरच पालिका तलाव असल्याची ओळखच पुसून प्रकार केले जात आहेत. बालगंधर्व येथील जलतरण तलावाला ना. ग. नांदे यांचे नाव सन्मानाने
देण्यात आले. मात्र, ठेकेदाराला
केवळ त्याचे व्यवस्थापन पाहण्यासाठी तलाव ताब्यात दिले असता त्याने पालिकेचा बोर्ड काढून स्वत:चा ‘द चॅम्पियन अ‍ॅक्टीव क्लब’ असा बोर्ड लावला आहे. त्यामुळे तलावामध्ये पोहण्यासाठी येणाऱ्यांना हा महापालिकेचा तलाव असल्याची माहिती पडत नाही. खाजगी क्लबचा तलाव असल्याचे त्यामुळे भासविले जात आहे.
खाजगी क्लबचा जलतरण तलाव असल्याची लोकांची समजूत झाल्याने लोक खाजगी दराने शुल्क भरतात. प्रति तास १०० रुपये तर प्रति महिना प्रशिक्षणासह दीड हजार रूपये इतके अवाजवी शुल्क याठिकाणी आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: The name of the contractor for the municipal pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.